Success Story : पुण्यातील उच्चशिक्षित महिलेची कमाल; गुलाब शेतीतून करतीये लाखोंची कमाई!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : ‘हौसेला मोल नसते’ ही म्हण आपल्याकडे बरीच प्रचलित (Success Story) आहे. ही म्हण महिलांना अगदी तंतोतंत लागू पडते. कारण महिला आज पुरुषांसोबत सर्व क्षेत्रामध्ये खांद्याला खांदा लावून काम करत आहेत. त्या देखील आज सर्वच क्षेत्रामध्ये आपला ठसा यशस्वीपणे उमटवताना दिसून येत आहेत. आज आपण पुण्यातील एका शेतकरी महिलेची यशोगाथा पाहणार आहोत. ज्यांनी शेती करायची हौस म्हणून, भाड्याने शेती घेतली. त्यात गुलाबाची लागवड करून त्या मागील आठ वर्षांपासून यशस्वीपणे लाखोंची कमाई (Success Story) करत आहेत.

गुलाब शेतीसाठी नोकरीला रामराम (Success Story Of Gulab Flower Farming)

हर्षदा सोनार असे या शेतकरी महिलेचे नाव असून, त्या आठ वर्षांपूर्वी पुण्यातील एका नामवंत कंपनीत उच्च पदावर (Success Story) काम करत होत्या. मात्र कामावर येताना-जाताना त्यांना शहरामध्ये विक्रीसाठी येत असलेल्या गुलाब फुलाला अधिक मागणी असल्याचे जाणवले. त्यामुळे त्यांना गुलाब फुलाच्या शेतीबाबत कुतूहल निर्माण झाले. त्यांनी युट्यूबच्या माध्यमातून गुलाब शेतीबाबत अधिक माहिती मिळवण्यास सुरुवात केली. शेती करण्याचे मन तर झाले. मात्र शेती करणार कुठे? असा प्रश्न त्यांच्यासमोर निर्माण झाला. कारण त्यांची स्वतःची शेती नव्हती. यावर मात करण्यासाठी त्यांनी भाड्याने शेतजमीन घेऊन आठ वर्षांपूर्वी, नोकरीला रामराम करत यशस्वीपणे गुलाब शेतीत पाय रोवले. गेल्या आठ वर्षांपासून त्या आपल्या गुलाब शेतीतून मोठी कमाई करत आहेत.

सण-समारंभांना मोठी मागणी

सुरुवातीला हर्षदा सोनार यांनी गुलाब शेती करणाऱ्या काही शेतकऱ्यांच्या शेतीला भेट दिली. त्याबाबत माहिती जाणून घेतली. त्यानंतर त्यांनी पुण्यातील शिक्रापूर या ठिकाणी पॉलीहाऊस सहित 1 बिघा जमीन भाड्याने घेतली. या जमिनीवर चांगली मशागत करून, गुलाब लागवड केली. जवळपास 4 वर्ष त्यांनी या ठिकाणी आपल्या पिकातून चांगले उत्पन्न घेतले. विशेष म्हणजे गणेशोत्सव, दसरा, दिवाळी, लग्नसराई आणि वेलेन्टाइनच्या संपूर्ण आठवडाभर काळात फुलांना मोठी मागणी असते. त्यामुळे आपल्याला वर्षभर भरघोस नफा मिळत असल्याचे महिला शेतकरी हर्षदा सोनार सांगतात.

किती होतोय उत्पादन खर्च?

दरम्यान, कोरोना काळात व्यवहार ठप्प झाल्याने आपला शिक्रापूर येथील करार त्यांनी संपुष्टात आणला. त्यानंतर त्यांनी खेड-शिवापुर परिसरात एक एकर पॉलीहाऊस भाड्याने घेत्तले. त्या ठिकाणी हर्षदा सोनार मागील तीन वर्षांपासून गुलाब शेती करत आहेत. विशेष म्हणजे शिक्रापूर व खेड-शिवापुर या दोनही ठिकाणी गेल्या आठ वर्षांपासून त्या पुण्यातून जाऊन-येऊन शेती करत आहेत. सुरुवातीचा खर्च वगळता एका एकरात महिन्याकाठी पॉलीहाऊसला त्यांना 30 हजार भाडे, मजूर, औषधे, खते यासाठी एकत्रिपणे 80 ते 90 हजारांचा खर्च होतो.

किती मिळतंय उत्पन्न?

साधारणपणे गुलाब फुलाला बाजारात वर्षभर मागणी असते. त्या आपल्या शेतातील 20 गुलाब फुलांचा एक बंच करुन बाजारात पाठवतात. वर्षभर त्यांना दरातील चढ-उतार लक्षात घेऊन, कमीत-कमी 30 रुपये ते जास्तीत जास्त 300 रुपये दर मिळतो. त्यांच्या एका एकरातून दररोज 800 ते 1200 फुलांची काढणी केली जाते. यातून वर्षातील कमी-जास्त भावांची सरासरी काढली तर प्रतिमहिना 1 लाख 25 हजारांपर्यंतचा निव्वळ नफा आपल्याला होत असल्याचे शेतकरी हर्षदा सोनार सांगतात. त्यामुळे शेतीची कोणतीही पार्श्वभूमी नसताना, गुलाब शेतीतून आर्थिक प्रगती साधणाऱ्या हर्षदा शेतीमध्ये नव्याने येऊ पाहणाऱ्या तरुण-तरुणींसाठी नक्कीच प्रेरणादायी ठरणार आहे.

error: Content is protected !!