हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातील सांगली, कोल्हापूरचा भाग म्हटले की ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा सधन पट्टा (Success Story) म्हणून या भागाची ओळख आहे. या दोन जिल्ह्यांमध्ये मोठया प्रमाणात ऊस लागवड केली जाते. मात्र या भागातील काही शेतकरी असेही आहेत. जे आपल्या पारंपरिक ऊस पिकाला फाटा देत अन्य पिकांच्या लागवडीकडे वळत आहेत. आणि विशेष म्हणजे हे शेतकरी वेगळ्या पिकांच्या लागवडीची वाट धरून, त्यातून अधिकचा नफा देखील मिळवत आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातील बिऊर गावच्या एका ऊस उत्पादक शेतकऱ्यानेही अशीच गवती चहाचे पीक घेण्याची वाट निवडली आणि त्यातून बक्कळ नफा देखील (Success Story) मिळवला आहे.
कोणत्या जातीची निवड? (Success Story Of Lemongrass Farming)
शिराळा तालुक्यातील बिऊर येथील अर्जुन पाटील (Success Story) असे या शेतकऱ्याचे नाव असून, त्यांनी गवती चहा लागवडीचा हा अनोखा प्रयोग केला आहे. अर्जुन पाटील यांनी सर्वप्रथम गवती चहा लागवडीपूर्वी जमिनीची चांगली मशागत करून घेतली. मशागतीनंतर जमिनीत योग्य त्या प्रमाणात शेणखत मिसळून घेतले. त्यांनतर त्यांनी गवती चहा लागवडीसाठी ‘ओळी 440 आर एल 16’ या जातीच्या गवती चहाचे कोंब उपलब्ध केले. लागवडीसाठी त्यांना हेक्टरी 22 हजार इतके कोंब लागले. लागवडीनंतर आता जवळपास चार-पाच महिन्यांनी त्यांच्या गवती चहाची कापणी सुरू झाली आहे.
किती मिळतो दर?
गवती चहा ही औषधी वनस्पती असून, एक बारमाही सुवासिक गवत आहे. कमी खर्चात जास्त उत्पादन देणाऱ्या गवती चहाची लागवड वर्षभर करता येते. असे शेतकरी अर्जुन पाटील सांगतात. त्यांच्या शेतातील गवती चहाची सध्या कापणी सुरु असून, त्यांना सरासरी 30 ते 40 रुपये प्रति किलोचा दर मिळत आहे. पहिल्या दोन वर्षात त्यांना आतापर्यंत हेक्टरी 20 टन ओल्या गवती चहाचे उत्पादन मिळाले आहे, असे शेतकरी अर्जुन पाटील यांनी सांगितले आहे.
कुठे करतात विक्री?
गवती चहाला मुंबईतील मार्केटमध्ये मोठी मागणी आहे. मुंबई येथील वाशी बाजार समितीत शिराळा तालुक्यातील अनेक व्यावसायिक आहेत. त्यामुळे शेतकरी पाटील यांनी त्या ठिकाणी गवती चहा पाठवण्यास सुरुवात केली. पाटील यांच्यासोबतच बिऊर गावातील जवळपास 70 शेतकरी हे गवती चहा पिकाची लागवड करत आहे. पाटील हे आपला सर्व माल मुंबई येथील बाजार समितीत पाठवतात. गवती चहामध्ये जीवनसत्व मोठ्या प्रमाणात असून, त्याचे अनेक आरोग्यदायी फायदे देखील आहेत. त्यामुळे मुंबईतील उच्चभ्रू लोकांमध्ये त्याला मोठी मागणी असते.
गवती चहाच्या लागवडीनंतर साधारणपणे चार-पाच महिन्यांनी पहिली कापणी सुरू होते. त्यानंतरची कापणी दर तीन महिन्यानी करता येते. साधारणपणे वर्षात चार कापण्या होतात. सुरुवातीला अनुभव नसल्याने काहीसा तोटा देखील सहन करावा लागला. मात्र, नंतर आपण गवती चहाच्या शेतीला तंत्रज्ञानाची जोड दिली. पिकासाठी सेंद्रिय खत व जीवाणू खतांचा वापर केला. पाण्याचे वेळेवर नियोजन केले. तसेच आंतर मशागत, कीटकनाशकांचा वापर यांची सांगड घालून उत्पादन घ्यायला सुरुवात केली आहे. असे शेतकरी अर्जुन पाटील यांनी गवती चहा शेतीच्या अनुभवाबाबत बोलताना म्हटले आहे.