हॅलो कृषी ऑनलाईन: सध्याच्या घडीला शेतकऱ्यांना एका पिकावर अवलंबून (Success Story) राहणे अवघड झाले आहे. अशातच शेतकऱ्यांना दुष्काळ, योग्य दर न मिळणे, मजुरांची समस्या यामुळे उत्पन्नाला फटका बसतो. मात्र संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यातील दोन भावंडांनी या परिस्थितीवर मात करत डाळिंब व सीताफळ या फळ शेतीसोबतच शेततळ्याच्या माध्यमातून शिंपल्याची यशस्वी शेती केली आहे. ज्यामुळे त्यांना शेतीसोबतच शिंपल्याच्या शेतीतून भरघोस कमाई (Success Story) होत आहे.
डाळिंब, सीताफळाची लागवड (Success Story Of Mussel Farming)
वैजापूर तालुक्यातील शेतकरी वासुदेव कुंदे यांची (Success Story) वडीलोपार्जित ४० एकर शेती आहे. मात्र दुष्काळी पट्टा असलेल्या या भागात शेतीतून चांगले उत्पन्न मिळणे तसे दुरापास्तच होते. मात्र, शेतकरी वासुदेव यांच्या दोन्ही मुलांनी जबाबदारी घेत, आज उत्तम शेती फुलवली आहे. अविनाश व दीपक कुंदे या दोघा भावांनी आज आपल्या ४० एकर क्षेत्रात १६ एकर डाळिंब, सुपर गोल्डन जातीचे ७ एकर सिताफळ लावले आहे. तर उर्वरित क्षेत्रात ते पारंपरिक पद्धतीने कापूस, मका, हरभरा, ज्वारी अशी पिके घेत आहेत.
दीड एकरात मोठे शेततळे
डाळिंबाची लागवड करताना दोघा भावांनी सुरुवातीला २०१३ मध्ये भगवा जातीची रोपे उपलब्ध करत साडे सात एकर जमिनीमध्ये डाळिंबाची लागवड केली. हळूहळू त्यात वाढ करत त्यांनी आज १६ एकर क्षेत्रावर डाळिंब लागवड केली आहे. यासोबतच ७ एकरात सीताफळ लागवडही त्यांनी केली आहे. अधिकच्या रानाला पाण्याच्या कमतरतेमुळे फटका बसू नये. म्हणून त्यांनी मन्याड तलावातून दोन पाईपलाईन केल्या आहेत. या पाईपलाईनच्या मदतीने त्यांनी थेट शेतातील विहिरीत पाणी आणले आहे. याशिवाय आपल्या दीड एकरात मोठे शेततळे देखील उभारले आहे. त्यामुळे त्यांनी पाण्याच्या समस्येवर मात केली आहे. त्यामुळे आपल्याला या दोन्ही बागेतून वर्षाकाठी चांगले उत्पन्न मिळत असल्याचे अविनाश सांगतात.
शिंपले, मत्स्पालन शेती
अविनाश व दीपक कुंदे या दोघा भावांनी शेतीसोबतच शेततळ्याचा शिंपले व मत्स्यपालनासाठी वापर केला आहे. यासाठी त्यांनी आपल्या शेततळ्यात डिसेंबर २०२२ मध्ये १०० रुपये प्रति शिंपला या दराने ३००० शिंपले सोडले आहे. तसेच कोंबडा या जातीच्या माशांचे बीज देखील टाकले आहे. सध्या त्यांनी सोडलेल्या शिंपल्यांच्या माध्यमातून मोत्याची निर्मिती झाली असून, ते आपल्या मोत्यांची विक्री करणार आहे. सध्याच्या घडीला मोत्याच्या बाजार भावाप्रमाणे त्यांना आपल्या ३००० शिंपल्यांच्या माध्यमातून १२ ते १५ लाख रुपये अपेक्षित उत्पन्न आहे. त्यासाठी त्यांना वार्षिक ३ ते ३.५ लाख रुपये खर्च आला असून, मोत्याच्या शेतीतून त्यांना वार्षिक १० ते १२ लाख रुपयांचा निव्वळ नफा होणार असल्याचे अविनाश कुंदे सांगतात.