Success Story : ऊसतोड मजुराच्या कष्टाला फळ; डाळिंब बागेतून 50 लाख कमावले!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : दरवर्षी चांगला पाऊस झाला. पिकांना देण्यासाठी वर्षभर मुबलक पाणी, वीज असेल. शेतमालाला योग्य दर (Success Story) मिळाला तर शेतकऱ्यांना कोणत्याही सरकारी मदतीची किंवा सरकारी योजनांची गरज नसते. शेती करताना शेतकरी अनेकदा हे वाक्य बोलून दाखवतात. सोलापूर जिल्ह्यातील सांगोला या दुष्काळी पट्ट्यातील एका ऊसतोड मजुराने हे सिद्ध करून दाखवले आहे. आज आपण ऊसतोड मजुरीतून डाळिंब शेतीकडे वळालेल्या शेतकऱ्याची यशोगाथा (Success Story) पाहणार आहोत.

किती मिळतंय उत्पन्न? (Success Story Of Pomegranate Farmer)

सोपान शिंगाडे असे या शेतकऱ्याचे नाव असून, ते पंढरपूरच्या सांगोला तालुक्यातील गौडवाडी गावचे रहिवासी आहेत. या शेतकऱ्याने ऊसतोड करून मजुरीच्या आर्थिक पाठबळावर तब्बल 20 एकरात डाळिंबाची बाग उभारली आहे. या शेतकऱ्याच्या मजुरीच्या कष्टाला चागंले फळ आले असून, त्यांना यावर्षी आपल्या डाळींब बागेपासून आतापर्यंत 50 लाखांचे उत्पन्न मिळाले आहे.

ऊसतोड मजुरीवर काढले दिवस

सोपान यांना माळरान जमिनीचा आधार होता. मात्र सांगोला तालुका हा दुष्काळी पट्ट्यात येत असल्याने त्यांना शेतीतून म्हणावे, असे उत्पन्न कधीच मिळत नव्हते. त्यामुळे त्यांचे कुटुंब ऊसतोड करून आपला उदरनिर्वाह चालवत असे. सोपान यांच्या कुटुंबासारखे तालुक्यातील अनेक कुटुंब बाहेरगावी ऊस तोडणीसाठी स्थलांतरित होतात. असे ते सांगतात. मात्र म्हणतात कष्टाला एक दिवस फळ मिळतेच. सोपान यांच्या बाबतीतही असेच काहीसे घडले. त्यांनी ऊसतोड करताना मजुरीची मागे राहिलेली ‘पै न पै’ जपून ठेवली होती. अशातच मागील तीन वर्षांमध्ये टेंभू उपसा सिंचन योजनेचे पाणी सांगोला तालुक्यात आले. आणि सोपान यांना शेतीतून एक स्थिर उत्पन्न मिळण्यास सुरुवात झाली आहे.

किती मिळतोय दर?

सोपान यांच्या माळरान जमिनीला पाण्याचा आधार मिळाल्याने, मागील तीन वर्षांपासून त्यांची जमीन चांगलीच बहरली आहे. सोपान यांनी सध्या आपल्या 20 एकर जमिनीत भगव्या डाळिंबाची लागवड केली आहे. यातील आठ एकरावरील डाळिंबाची सध्या काढणी झाली असून, त्यांच्या डाळिंबाला 125 रूपये प्रति किलो इतका उच्चांकी दर मिळाला आहे.

युरोपात निर्यात

शेतकरी सोपान आपल्या शेतात उत्पादित डाळिंब युरोपीय देशांमध्ये निर्यात करत आहेत. वजन, आकार, रंग आणि चव अशी विविध गुणवैशिष्ट्ये असल्याने त्यांच्या डाळिंबाला विशेष मागणी असल्याचे ते सांगतात. त्यांनी 40 टन डाळिंबाची युरोपात निर्यात केली असून, यातून त्यांना आतापर्यंत 50 लाख रूपयांचे उत्पन्न मिळाले आहे. सोपान यांनी डाळिंब लागवडीपासून ते फळ धारणेपर्यंत बागेचे योग्य व्यवस्थापन केले आहे. परिणामी त्यांना निर्यातक्षम डाळिंबाचे उत्पादन घेणे शक्य झाले असून, त्यांची डाळिंब बाग पाहण्यासाठी परिसरातील शेतकरी मोठ्या प्रमाणात गर्दी करत आहेत.

error: Content is protected !!