Success Story : 70 लाखांचा बंगला, त्यावर ठेवला ट्रॅक्टर; अनोख्या ट्रॅक्टर प्रेमाची सर्वत्र चर्चा!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : कष्टाला तोड नसते. कष्ट केल्यास कोणतेही काम छोटे किंवा मोठे नसते. याच कष्टांच्या जोरावर (Success Story) एखाद्या क्षेत्रात माणसाचा हातखंडा निर्माण झाला की मग त्या क्षेत्रात माणूस सर्वोच्च ठिकाणी पोहचू शकतो. हेच सिद्ध करून दाखवले आहे धाराशिव जिल्ह्यातील अनाळा गावचे ट्रॅक्टर मेकॅनिक अशोक भिलारे यांनी. ट्रॅक्टर दुरुस्तीच्या व्यवसायामुळे त्यांनी मोठी आर्थिक प्रगती केली असून, ट्रॅक्टरप्रती असलेली आपली कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी त्यांनी चक्क आपल्या 70 लाखांच्या बंगल्याच्या छतावरच ट्रॅक्टर ठेवला आहे. त्यांच्या या अनोख्या ट्रॅक्टर प्रेमाची (Success Story) सर्वत्र चर्चा होत आहे.

ट्रॅक्टर मेकॅनिक अशोक भिलारे हे आज कोणताही ट्रॅक्टर दुरुस्तीला आल्यास, केवळ बघताच एखाद्या डॉक्टरप्रमाणे ट्रॅक्टरवरील उपचार (Success Story) सांगतात. ते धाराशिव जिल्ह्यातील परंडा तालुक्यातील अनाळा गावचे रहिवासी आहे. त्यांनी आपल्या ट्रॅक्टर दुरुस्तीच्या व्यवसायाच्या जोरावर कष्टातून 70 लाख रुपयांचा आलिशान बंगला बांधला आहे. हा बंगला बांधून झाल्यानंतर आपल्या ट्रॅक्टर व्यवसाया प्रति असलेली कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी त्यांनी छतावर ट्रॅक्टरला स्थान दिले आहे. ट्रॅक्टर दुरुस्तीच्या व्यवसायामुळे आपली आणि आपल्या कुटुंबाची आर्थिक भरभराट झाली आहे. ट्रॅक्टर हीच माझ्यासाठी लक्ष्मी आहे. अशी भावना ते व्यक्त करतात.

कुटुंबाची आर्थिक भरभराट (Success Story Of Tractor Mechanic)

अशोक यांची परिस्थिती अत्यंत हलाखीची असल्याने त्यांना आयटीआय पर्यंत शिक्षण घेता आले. घरी केवळ चार एकर जिरायती जमीन असल्याने, त्यांनी काही काळ पुण्यात नोकरी केली. मात्र काही दिवसातच पुन्हा गावाकडची वाट धरत करमाळा तालुक्यातील जेऊर या ठिकाणी ट्रॅक्टर गॅरेजमध्ये काम सुरु केले. काही काळानंतर त्यांनी आपल्या गावी अनाळ्यात दोन गुंठे जागा घेऊन स्वतःचे गॅरेज सुरू केले. दिवसरात्र मेहनत करत आजपर्यंत हजारो ट्रॅक्टरची दुरुस्ती त्यांनी केली आहे. याच ट्रॅक्टर दुरुस्ती व्यवसायाच्या जोरावर त्यांनी आज 10 एकर शेती विकत घेतली आहे. याशिवाय 70 लाख रुपयांचा आलिशान बंगला देखील बांधला आहे. तसेच दोन मुलांना उच्च शिक्षण देण्यासाठी याच व्यवसायाने त्यांना मदत केली आहे.

हौसेला मोल नसते

ट्रॅक्टर दुरुस्ती व्यवसायाने आपल्याला खूप काही दिल्याची जाणीव त्यांना सतावत होती. याच जाणिवेतून त्यांनी एक ट्रॅक्टर छतावर ठेवण्याचे ठरवले. यासाठी त्यांनी एक चालू स्थितीतील ट्रॅक्टर सव्वा लाख रुपयांना खरेदी केला. त्याची दुरुस्ती करत, रंगरंगोटी, सजावट केली. त्यासाठी त्यांना जवळपास एकत्रितपणे दोन लाख रुपयांपर्यंत खर्च आला. मात्र म्हणतात ना हौसेला मोल नसते. या उक्तीप्रमाणे त्यांनी पैशांचा कोणत्याही विचार न करता 11 हजार रुपये खर्चून क्रेनच्या साहाय्याने उचलत हा ट्रॅक्टर बंगल्यावर ठेवला आहे. त्याला ते दररोज सकाळी 10 ते 15 मिनिटे चालू करतात. आणि मगच आपल्या कामावर जातात.

ट्रॅक्टरचे डॉक्टर

अशोक यांनी मागील 20-25 वर्षांमध्ये हजारो ट्रॅक्टर दुरुस्ती केले आहेत. आज कोणत्याही कंपनीचा कोणताही ट्रॅक्टर दुरुस्तीला आल्यास, केवळ बघताच एखाद्या डॉक्टरप्रमाणे ते ट्रॅक्टरवरील उपचार सांगतात. महिन्याला जवळपास 200 ट्रॅक्टरची दुरुस्ती ते करत असून, त्यासाठी त्यांच्याकडे त्यांनी 16 मुलांना काम दिले आहे. त्यांच्या याच अनुभवामुळे आज परंडा, भूम, बार्शी, करमाळा आणि अन्य आसपासच्या तालुंक्यांमधून अनेक शेतकरी आणि ट्रॅक्टरमालक त्यांच्याकडे दुरुस्तीसाठी येतात.

error: Content is protected !!