हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यासह देशातील अनेक शेतकरी शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा (Success Story) वापर करत मोठ्या प्रमाणात उत्पन्न मिळवत आहे. गेल्या दशकभरापासून शेतीला विशेष महत्व प्राप्त झाले असून, अनेक सुशिक्षित तरुणही शेती क्षेत्रामध्ये आपले नशीब आजमावत आहेत. हे तरुण आपल्या शिक्षणाच्या जोरावर शेतीला व्यावसायिक स्वरूप देताना दिसून येत आहे. उत्तराखंडमधील एका सुशिक्षित तरुणानेही भाडे कराराने २५ एकर जमीन घेऊन, त्यावर पेरूची बाग फुलवली आहे. इतकेच नाही तर त्याने या पेरूच्या करार शेतीतून १ कोटींची कमाई केली आहे. आज आपण या तरुण शेतकऱ्याची यशोगाथा (Success Story) पाहणार आहोत.
खासगी नोकरीचा राजीनामा (Success Story Of Guava Farming)
राजीव भास्कर असे या तरुण शेतकऱ्याचे नाव असून, ते उत्तराखंड राज्यातील नैनिताल येथील रहिवासी (Success Story) आहेत. ते छत्तीसगड राज्यातील रायपूर या ठिकाणी एका बियाणे कंपनीत काम करते होते. याच अनुभवाच्या जोरावर कंपनीमार्फत ते देशातील निरनिरळ्या भागातील शेतकऱ्यांना भेटले होते. ज्यामुळे त्यांना शेतीमध्ये आवड निर्माण झाली. त्यातून त्यांनी शेतीकडे वळण्याचा निर्णय घेतला. यासाठी त्यांनी पेरूच्या ‘थाई’ प्रजातीची माहिती मिळवली. २०१७ मध्ये त्यांनी धैर्याने आपल्या नोकरीचा राजीनामा देत, शेती क्षेत्रामध्ये पाऊल ठेवले. यासाठी त्यांनी पहिल्या टप्पात हरियाणा राज्यातील पंचकुला या ठिकाणी पाच एकर शेती भाडे कराराने घेतली. या जमिनीत त्यांनी थाई पेरूची लागवड केली.
पहिल्या टप्प्यातील उत्पन्न?
2017 मध्ये ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात त्यांना आपल्या पाच एकर पेरू बागेतून उत्पादन मिळण्यास सुरुवात झाली. पहिल्या वर्षी त्यांनी आपल्या पेरू बागेतून २० लाखांची कमाई केली. पेरूच्या शेतीसाठी त्यांनी सेंद्रिय पद्धतीचा वापर करत, जैविक खतांच्या माध्यमातून उत्पादन घेतले. यावेळी त्यांना आपल्या नोकरीतील अनुभवाचा मोठा फायदा झाल्याचे ते सांगतात. पहिल्या टप्प्यातील यशाच्या जोरावर त्यांनी २०१९ मध्ये अन्य तीन गुंतवणूकदारांच्या मदतीने पंजाब राज्यातील रुपनगर या ठिकाणी जवळपास ५५ एकर जमीन ही भाडे कराराने घेतली. रुपनगर येथील या ५५ एकर जमिनीपैकी, त्यांनी सध्या २५ एकर जमिनीत पेरूची लागवड केली आहे. तर २०२१ पर्यंत पंचकुला येथील जमिनीत त्यांची ५ एकरातील पेरूची बागेतील फळ काढणीपर्यंत ठेवली. त्यानंतर त्यांनी एकाच ठिकाणी लक्ष केंद्रित करण्यासाठी पंचकुला येथील जमिनीचा भाडे करार संपुष्टात आणला.
एकरी 6 लाखांचा नफा
पावसाळ्याच्या कालावधीत आणि हिवाळयात अशी दोनवेळा ते आपल्या पेरू बागेची काढणी करत असल्याचे सांगतात. बाजारातील उत्पादन वाढून दराचा फटका बसू नये, यासाठी ते आपल्या पेरूची विशेषत्वाने मार्केटिंग करतात. ते आपल्या पेरूची १० किलोच्या बॉक्समध्ये पँकिंग करून, दिल्ली येथील बाजार समितीत विक्रीसाठी पाठवतात. तरुण शेतकरी राजीव भास्कर यांच्या म्हणण्यानुसार, त्यांना प्रति एकरी सरासरी ६ लाखांचा नफा मिळाला आहे. याप्रमाणे त्यांना तीन भागीदारांसह आपल्या २५ एकरात पेरू लागवडीतून १ कोटीहून अधिक कमाई होत आहे.
शेतकरी राजीव भास्कर सांगतात, ते आपल्या शेतीमधील एका पेरूच्या झाडापासून २५ किलो उत्पादन घेत आहेत. त्यांनी प्रति झाड उत्पादन 40 किलोपर्यंत वाढवण्याचा मानस बाळगला आहे. रुपनगर या ठिकाणी आपल्या आजूबाजूचे शेतकरी भरमसाठ रासायनिक खते वापरत असताना, राजीव हे पूर्णतः जैविक पद्धतीने पेरूचे उत्पादन घेत आहेत. त्यामुळे ते शेतकऱ्यांना जैविक शेतीकडे वळण्याचा सल्ला देतात.