Success Story : कमी पाण्यात तैवान पेरूची लागवड; शेतकऱ्याची लाखोंची कमाई!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : कमी पाण्यात अधिक उत्पन्न देणारी शेती म्हणून पेरू शेतीकडे (Success Story) पाहिले जाते. कोरडवाहू शेतकऱ्यांसाठी तर पेरू शेती ही उत्तम पर्याय ठरली आहे. त्यामुळे आता शेतकरी जास्त पाणी लागणाऱ्या पिकांऐवजी कमी पाण्यात होणाऱ्या पिकांच्या लागवडीला प्राधान्य देत आहेत. असाच काहीसा प्रयोग छत्रपती संभाजीनगरमधील शेतकरी राजेंद्र आणि श्रीकांत हाके या भावंडांनी केला असून, त्यात त्यांना यशही मिळाले आहे. या दोघा भावांनी आपली मोसंबी बाग काढून तैवान पेरूची लागवड (Success Story) केली आहे. पहिल्याच वर्षी त्यातून त्यांना लाखोंची कमाई झाली आहे.

शेतकरी श्रीकांत हाके यांची छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील आडगाव बुद्रुक येथे शेती आहे. शहरापासून अगदी 15 किमीवर त्यांचे गाव असून, त्यांनी आपल्या दीड एकर शेतीमध्ये तैवान पेरूची लागवड (Success Story) केली आहे. गेल्या काही वर्षांपासून ते पारंपरिक पद्धतीने मोसंबी पिकाची शेती करत होते. मात्र कालानुरूप जुळवून घेत दोन वर्षांपूर्वी त्यांनी आधुनिक शेतीकडे वळण्याचा निर्णय घेतला. यासाठी अगदी कमी पाणी आणि कमी खर्चात येणाऱ्या तैवान पेरूची निवड केली. या पिकाला त्यांना जास्त मशागत करण्याची देखील आवश्यकता नसते. त्यामुळे ही तैवान पेरूची शेती करणे सोपे असल्याचे शेतकरी श्रीकांत हाके यांनी म्हटले आहे.

किती मिळाले उत्पन्न? (Success Story Of Taiwan Guava Farming)

श्रीकांत यांनी दोन वर्षांपूर्वी दीड एकरात या तैवान पेरूची लागवड केली. पहिल्या वर्षी त्यांनी आपल्या पेरू या पिकामध्ये आंतरपीक घेतले. या पिकातूनही त्यांना पहिल्या वर्षी आर्थिक उत्पन्न मिळाले. तसेच पेरू पिकातून आता दुसऱ्याच वर्षी त्यांना उत्पन्न मिळण्यास सुरुवात झाली असून, आतापर्यंत जवळपास 400 कॅरेट पेरू उत्पन्न मिळाले आहे. विशेष म्हणजे त्यांच्या बागेची काढणी अजूनही सुरूच असून, त्यांना चांगले उत्पन्न मिळण्याची आशा आहे. आतापर्यंतच्या उत्पादनातून त्यांना जवळपास तीन लाखांपर्यंत उत्पन्न मिळाले आहे.

आणखी उत्पन्नाची अपेक्षा

शेतकरी श्रीकांत हाके यांनी म्हटले आहे की, “आपण पारंपरिक पद्धतीने मोसंबी लागवड करत होतो. मात्र मोसंबी पिकाला अधिक पाण्याची आवश्यकता असल्याने आपण तैवान पेरूची लागवड करण्याचा निर्णय घेतला. त्यातून दुसऱ्याच वर्षी उत्पन्न मिळण्यास सुरुवात झाली असून, आतापर्यंत दीड एकरातून तीन लाखांचे उत्पन्न मिळाले आहे. अजूनही काढणी सुरू असून, त्यात आणखी वाढ अपेक्षित आहे.”

आधुनिक शेतीची कास धरा

मोसंबी या पारंपरिक पिकाला अधिक पाण्यासह मेहनतही अधिक घ्यावी लागते. त्यामुळे शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत कमी पाण्यात अधिक उत्पादन देणारी शेती करावी. नवयुवक तरुणांनी शेतीतील बारकावे समजून घेत, आधुनिक शेतीचा पर्याय निवडायला हवा. जेणेकरून कमी संसाधने वापरून, आणि कमी मेहनतीमध्ये आपल्याला गुणवत्तापूर्ण उत्पादन घेण्यास मदत होते. असेही शेतकरी श्रीकांत हाके यांनी म्हटले आहे.

error: Content is protected !!