हॅलो कृषी ऑनलाईन : ‘एकीचे बळ मिळते फळ’ हे वाक्य आपण अनेकदा ऐकत आलो आहे. शेतकऱ्यांनी जर एकजूट (Success Story) केली तर काय होऊ शकते. हे आपण शेती प्रश्नांवरील आंदोलनांदरम्यान खूपदा अनुभवलंय. सरकार कोणतेही असो शेतकऱ्यांनी एकजूट (Success Story) होऊन आंदोलन केल्यास सरकारला गुडघे टेकावेच लागतात. मात्र आता याच शेतकऱ्यांच्या गट शेतीच्या माध्यमातून हळद शेती कशी बहरली. आणि शेतकऱ्यांना त्यातून लाखोंची कमाई कशी मिळत आहे. याबाबतची गट शेतीची यशोगाथा आज आपण पाहणार आहोत.
कसा झाला गट स्थापन (Success Story of Turmeric Group Farming)
महाराष्ट्रात सांगली जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात हळद पिकाची लागवड केली जाते. त्यातून येथील शेतकऱ्यांना चांगले उत्पन्नही मिळते. मात्र बिहारच्या कुशीनगर जिल्ह्यातील 500 शेतकऱ्यांनी एकजूट होऊन 100 एकरावर हळदीची लागवड केली आहे. यातून शेतकऱ्यांना वार्षिक जवळपास 5 कोटींची कमाई होत आहे. बीएम त्रिपाठी या कुशीनगर येथील शेतकऱ्याने सर्वप्रथम 2015 साली टाटा ट्रस्टच्या माध्यमातून काही शेतकऱ्यांचा गट स्थापन करत हळदीची शेती करणे सुरु केले. हळद शेतीतून होणारा फायदा पाहता त्यांनी 2022 साली बंगळुरू येथील अझीम प्रेमजी फाउंडेशन सोबत मिळून मोठ्या प्रमाणात हळद लागवड करण्यास सुरुवात केली आहे. सध्या या गटाने 500 शेतकऱ्यांना एकत्र आणत 100 एकरावर हळद लागवड केली आहे. त्रिपाठी सांगतात, सध्या उत्पादन खर्च जाता एकरी लाख रुपयांचे उत्पन्न मिळत आहे. येत्या काळात आमचे लक्ष्य 1500 शेतकऱ्यांना एकत्र आणण्याचे आहे.
कोणत्या जातींची लागवड
हळद शेतीसाठी या शेतकरी गटाने राजेंद्र सोनिया, राजेंद्र सोनाली, नरेंद्र हल्दी-1 प्रजातींची निवड केली आहे. या सर्व शेतकऱ्यांनी गट स्थापन केला असून, सर्व जण त्यात गुंतवणूकदार आहेत. त्रिपाठी सांगतात, शेतकऱ्यांना अधिकाधिक कमाई करायची असेल तर हळद शेती हा उत्तम पर्याय आहे. हळदीची लागवड मुरमाड जमिनीमध्ये केल्यास त्यातून अधिक उत्पन्न मिळते. हळद पिकाला योग्य वेळी काढणी करावी लागते. एका हळदीच्या झाडापासून या गटाला सध्या 500 ते 700 ग्राम हळद उत्पादन होत आहे.
शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शनाची गरज
शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन व प्रशिक्षण मिळाल्यास आणि त्यांना एका छताखाली आणल्यास मोठ्या प्रमाणात उत्पन्न मिळते. आणि शेतकऱ्यांना आर्थिक लाभही होतो. आवश्यकतेनुसार त्यांना चांगल्या प्रजातींची रोपे उपलब्ध करून दिल्यास आणि पीक संगोपन करण्यास मार्गदर्शन मिळाले. तर शेतकऱ्यांना आर्थिक परिस्थिती नक्कीच फरक पडतो, असे त्रिपाठी सांगतात.
अनेक अंगाने गुणकारी
दक्षिण महाराष्ट्रातील काही जिल्हे आणि निझामाबाद या भागामध्ये मोठ्या हळद उत्पादन होते. हळद पीक हे अनेक अंगाने गुणकारी आहे. तिच्या सेवनाने रोग प्रतिकारशक्ती वाढते त्यामुळे घराघरात हळदीचा रोजच्या आहारात वापर होतो. याशिवाय हळद हे जिवाणूनाशक असल्याने काही जखम झाल्यास ती प्रथमोपचारासाठी गुणकारी मानली जाते. याशिवाय हळदीला पिवळा रंग देणारे कर्क्यूमिन कर्करोगाच्या पेशींच्या वाढीस प्रतिबंध करते.