हॅलो कृषी ऑनलाईन : नोकरी सोडून शेतीची वाट धरणे तितकेसे सोपे (Success Story) नसते. कधी दुष्काळ तर कधी अवकाळी पाऊस अशा संकटांमधून वाट काढत, त्यांना खंबीरपणे तोंड देत मार्गक्रमण करावे लागते. कोल्हापूर जिल्ह्यातील पट्टणकोडोली येथील शेतकरी सचिन काकासो अवटे (Success Story) गेल्या 8 वर्षांपासून हा प्रवास करत असून, कारले आणि टोमॅटो, दोडका, मिरची, वांगी लागवडीतून लाखोंची कमाई करत आहे.
भाजीपाला पिकांची लागवड (Success Story Of Vegetables Farmer)
हातकणंगले तालुक्यातील पट्टणकोडोली येथील शेतकरी सचिन अवटे (Success Story) यांनी पदवीत्तर पदवी (एमए) पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले आहे. शिक्षण झाल्यानंतर त्यांनी काही काळ एमआयडीसीमध्ये नोकरी केली. मात्र अल्प पगारात काम करणे त्यांना जड जात होते. त्यामुळे सचिन यांनी 2015 मध्ये शेती करण्याचा निर्णय घेतला. यात त्यांना त्यांच्या कुटुंबियांचीही साथ मिळाली. सचिन यांचे वडील आपल्या सव्वा दोन एकरात पारंपरिक पद्धतीने ऊस लागवड करत होते. मात्र सचिन यांनी 2015 मध्ये भाजीपाला पिकांची लागवड करण्यास सुरुवात केली.
बाजाराचा योग्य अंदाज
सुरुवातीला सचिन यांना भाजीपाला आणि फळभाज्यांची लागवडीबद्दल अधिक माहिती नव्हती. मात्र त्यांनी मित्रांच्या आणि कृषी सेवा केंद्राच्या माध्यमातून एक एकरात फळभाज्यांची लागवड करण्यास सुरुवात केली. सुरुवातीला त्यांनी दोडका, मिरची, वांगी या पिकांची निवड केली. तसेच कारले आणि टोमॅटोला मिळणारा भाव त्यांना खुणावत होता. गेल्या 8 वर्षांपासून बाजारातील मागणी दर यांचे तंतोतंत गणित साधून सचिन अवटे लाखोंची कमाई करत आहे. सध्या त्यांनी आपल्या एक एकरात साई जातीची टोमॅटो आणि कारली लावली आहे. बाजारभावही चांगला मिळत असल्याने त्यांना मोठा नफा होत आहे.
तंत्रज्ञानाधिष्टीत शेती फायद्याची
अवटे यांना मशागतीसह रोपे आणि औषध फवारणीसाठी आतापर्यंत एकत्रितपणे 80 हजार रुपयांचा खर्च आला आहे. साधारणपणे 2 महिन्याच्या कालावधीनंतर त्यांच्या कारली आणि टोमॅटोची काढणी सुरू आहे. दररोज त्यांची 300 किलो कारली तर 700 किलो टोमॅटो कोल्हापूर आणि इचलकरंजी मार्केटला जात आहे. त्यांच्या टोमॅटोला सध्या 30 ते 35 प्रति किलो तर कारली 20 ते 25 रुपये दराने विकली जात आहे. यातून त्यांना केवळ सहा महिन्याच्या कालावधीत दोन हफ्तात सहा ते सात लाखांचा नफा झाल्याचे ते सांगतात. पारंपरिक पिकांच्या मागे न लागता योग्य मार्गदर्शन घेऊन आधुनिक तंत्रज्ञानाधिष्टीत शेती केल्यास नक्कीच फायदा होतो, असा संदेश ते शेतीमध्ये येऊ पाहणाऱ्या नवीन तरुण शेतकऱ्यांना देतात.