Sugar Export : 10 लाख टन साखर निर्यातीस परवानगी द्यावी; इस्माची केंद्राकडे मागणी!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : यावर्षीच्या गाळप हंगामाच्या सुरुवातीला देशातील साखर उत्पादन (Sugar Export), मागील वर्षीच्या तुलनेत कमी राहण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. मात्र, आता हंगामाच्या शेवटी महाराष्ट्र, कर्नाटकसह देशातील साखर उत्पादनात काहीशी वाढ होणार आहे. ज्यामुळे चालू गाळप हंगामात 10 लाख टन साखर निर्यातीस (Sugar Export) परवानगी देण्यात यावी. अशी मागणी देशातील साखर कारखान्यांची शिखर संस्था असलेल्या इंडियन शुगर मिल्स एसोसिएशनने (इस्मा) केंद्र सरकारकडे केली आहे.

यंदा समाधानकारक उत्पादन (Sugar Export From India)

देशात साखर निर्यातीस पूर्णतः बंदी घालण्यात आली आहे. प्रामुख्याने यावर्षी साखर उत्पादन घटणार असल्याने, हा निर्णय 31 ऑक्टोबर 2023 नंतर देखील कायम ठेवण्यात आला होता. मात्र, आता महाराष्ट्र आणि कर्नाटक या राज्यांमध्ये मागील वर्षीच्या तुलनेत चांगले साखर उत्पादन नोंदवले गेले आहे. ज्यामुळे देशपातळीवर साखर उत्पादन वाढण्यास मदत झाली आहे. याच पार्श्वभूमीवर इंडियन शुगर मिल्स एसोसिएशनने वाणिज्य मंत्रालयाच्या सचिवांना पत्र लिहीत चालू गाळप हंगामात 10 लाख टन साखर निर्यातीस परवानगी देण्यात यावी, अशी मागणी केली आहे.

97 लाख टन साखर साठा अतिरिक्त

इंडियन शुगर मिल्स एसोसिएशनने वाणिज्य मंत्रालयाला पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे की, चालू वर्षीच्या गाळप हंगाम सुरु होण्यापूर्वी 1 ऑक्टोबर 2023 रोजी 56 लाख टन साखरेचा साठा शिल्लक होता. प्रामुख्याने देशाची वार्षिक साखरेची मागणी 285 लाख टन इतकी आहे. तर इथेनॉल निर्मिती वगळता देशभरात चालू हंगामात साखरेचे निव्वळ अंदाजे उत्पादन 320 लाख टन उत्पादन होण्याची शक्यता आहे. अर्थात यंदा 97 लाख टन साखरेचा साठा अतिरिक्त असणार आहे. ज्यामुळे सध्याच्या घडीला किमान 10 लाख टन साखर निर्यातीस परवागी दिली जावी. जेणेकरून कारखान्यांना ऊस उत्पादक शेतकऱ्यांची रक्कम वळती करण्यास मदत होईल, असेही इस्माने आपल्या पत्रात म्हटले आहे.

error: Content is protected !!