हॅलो कृषी ऑनलाईन : केंद्र सरकारने नोव्हेंबर 2023 या महिन्यासाठी देशांतर्गत साखर विक्रीसाठी (Sugar Price) दुसऱ्या टप्प्यातील 8 लाख टन साखरेचा कोटा (Sugar Price) निश्चित केला आहे. तसेच यापूर्वीच्या कोट्याला 30 नोव्हेंबर 2023 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. अशी माहिती केंद्रीय अन्न व नागरी पुरवठा मंत्रालयाकडून देण्यात आली आहे.
यापूर्वी 23 ऑक्टोबर रोजी अन्न आणि नागरी पुरवठा मंत्रालयाकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या अधिसूचनेत म्हटले होते की, केंद्र सरकारकडून साखर कारखान्यांसाठी नोव्हेंबर 2023 या महिन्यासाठी देशांतर्गत साखर विक्रीसाठी 15 लाख टन साखरेचा पहिल्या टप्प्यातील कोटा निश्चित करण्यात आला होता. त्यानंतर आता पुन्हा 8 लाख टन साखरेचा दुसऱ्या टप्प्यातील कोटा निश्चित करण्यात आला आहे. त्यामुळे आता नोव्हेंबर महिन्यातील देशांतर्गत साखर विक्रीचा एकूण कोटा 23 लाख टन इतका झाला आहे.
ऑक्टोबर महिन्यात इतका कोटा (Sugar Price In India)
केंद्रीय अन्न आणि नागरी पुरवठा मंत्रालयाकडून ऑक्टोबर 2023 या महिन्यासाठी साखर कारखान्यांसाठी एकूण 29 लाख टन साखर विक्रीचा कोटा निश्चित केलेला होता. तर मागील वर्षीच्या नोव्हेंबर 2022 या महिन्यासाठी देशांतर्गत विक्रीसाठी केंद्र सरकारकडून साखर कारखान्यांना 22 लाख टन साखर विक्रीचा कोटा निर्धारित करण्यात आला होता.
किंमती कमी होण्यास मदत
जाणकारांच्या मते चालू साखर हंगामात ऊस गाळप जोरात सुरू असून, उत्तरप्रदेश महाराष्ट्र कर्नाटक आदी आघाडीच्या राज्यांमध्ये साखर उत्पादन जोरात सुरू आहे. यामुळे बाजारात साखरेची उपलब्धता होण्यास मदत होत आहे. त्यातच आता दिवाळीचा सणही संपला असून, दुसऱ्या टप्प्यातील 8 लाख टन साखरेचा कोटा निर्धारित करण्यात आल्याने साखरेच्या किंमती कमी होण्यास मदत होणार आहे.
केंद्र सरकारने साखर पुरवठा नियंत्रित ठेवणे आणि दर निश्चितीमध्ये स्थिरतेसाठी मासिक कोटा वितरण प्रणाली लागू केली आहे. त्यानुसार देशात साखरेचा साठा पुरेसा असल्याबाबत केंद्र सरकार ग्राहकांना आश्वस्त करत आहे. साखर विक्रीची माहिती दररोज घेणे, बाजारातील दराची माहिती घेऊन दर न वाढण्यासाठी प्रयत्न करणे आदी बाबींमुळे सणासुदीच्या काळातही साखरेचे स्थानिक दर फारसे वाढले नसल्याची स्थिती आहे.