हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात यावर्षी 28 डिसेंबर 2023 पर्यंत एकूण 195 साखर (Sugar Production) कारखान्यांनी आपले ऊस गाळप सुरू केले आहे. या कारखान्यांनी 401.84 लाख टन उसाचे गाळप केले असून, त्या माध्यमातून राज्यात आतापर्यंत सुमारे 356.18 लाख क्विंटल (35.61 लाख टन) साखरेचे उत्पादन झाले आहे. अशी माहिती राज्याच्या साखर आयुक्तालयाकडून (Sugar Production) जाहीर करण्यात आली आहे.
राज्यातील एकूण 195 साखर कारखान्यांमध्ये 96 सहकारी आणि 99 खासगी साखर (Sugar Production) कारखान्यांचा समावेश आहे. राज्यातील साखर कारखान्यांना सरासरी 8.84 टक्के साखर उतारा मिळवण्यात यश आले आहे. मागील वर्षी याच कालावधीत 201 साखर कारखान्यांनी आपले गाळप सुरु केले होते. त्याद्वारे कारखान्यांनी जवळपास मागील वर्षी 478.94 लाख टन उसाचे गाळप करून, 446.57 लाख क्विंटल साखरेचे उत्पादन केले होते. अर्थात मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी आतापर्यंत 90.39 लाख क्विंटल (9.03 लाख टन) साखर उत्पादन कमी झाले आहे.
सर्वाधिक साखर उतारा कोल्हापुरात (Sugar Production In Maharashtra)
साखर आयुक्तालयाकडील आकडेवारीनुसार, 2022-23 च्या हंगामात 28 डिसेंबर 2023 पर्यंत कोल्हापूर विभागात 84.88 लाख क्विंटल (8.48 लाख टन) साखरेचे उत्पादन झाले असून, कोल्हापुरातील कारखान्यांना 10.09 टक्के इतका साखर उतारा मिळाला आहे. कोल्हापूर विभागात 37 साखर कारखाने असून, त्यापैकी 24 सहकारी आणि 13 खाजगी साखर कारखाने आहेत.
सोलापूर सर्वाधिक कारखाने सुरु
दरम्यान, सोलापूर विभागात राज्यातील सर्वाधिक 47 साखर कारखान्यांनी आपले गाळप सुरू केले आहे. साखर आयुक्तालयाच्या आकडेवारीनुसार, सोलापूर विभागात 28 डिसेंबरपर्यंत 87.06 लाख टन उसाचे गाळप झाले असून, त्याद्वारे 70.71 लाख क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे. सोलापूर विभागातील कारखान्यांना 8.12 टक्के इतका साखर उतारा मिळाला आहे. राज्यात आतापर्यंत सर्वात कमी साखर कारखाने हे अमरावती विभागात सुरु करण्यात आले असून, त्या ठिकाणी केवळ 2 कारखान्यांनी आपले गाळप सुरु केले आहे.