हॅलो कृषी ऑनलाईन : “आगामी काळात साखरेच्या दरात (Sugar Production) वाढ होऊ शकते. कारण यावर्षी 1 ऑक्टोबर 2023 ते 15 फेब्रुवारी 2024 या कालावधीत देशातील साखर उत्पादन 223.68 लाख टन इतके नोंदवले गेले आहे. जे मागील वर्षी याच कालावधीत 229.37 लाख टन नोंदवले गेले होते. अर्थात यावर्षी साखर उत्पादनात (Sugar Production) आतापर्यंत 5 टक्के घट नोंदवली गेली आहे.” असे ‘इंडियन शुगर एंड बायो-एनर्जी मैन्युफैक्चरर्स असोसिएशन’ने म्हटले आहे.
महाराष्ट्र, कर्नाटकात मोठी घट (Sugar Production In India)
महाराष्ट्र या प्रमुख साखर उत्पादक राज्यामध्ये यावर्षी आतापर्यत 79.45 लाख टन साखर उत्पादन (Sugar Production) झाले आहे. जे मागील वर्षी याच कालावधीत 85.93 लाख टन नोंदवले गेले होते. याचप्रमाणे तिसरे सर्वात मोठे साखर उत्पादक राज्य असलेल्या कर्नाटकातही यावर्षी आतापर्यंत 43.20 लाख टन साखर उत्पादन झाले आहे. जे मागील वर्षी याच कालावधीत 46.05 लाख टन नोंदवले गेले होते. याशिवाय बिहार, हरियाणा, पंजाब आणि अन्य राज्यांमध्ये एकत्रिपणे आतापर्यंत 21.91 लाख टन साखर उत्पादन नोंदवले गेले आहे. जे मागील वर्षी याच कालावधीत एकत्रिपणे 23.29 लाख टन इतके नोंदवले गेले होते. अर्थात उत्तर प्रदेश वगळता सर्वच राज्यांमध्ये साखर उत्पादन घटले असल्याचे ‘इंडियन शुगर एंड बायो-एनर्जी मैन्युफैक्चरर्स असोसिएशन’ने म्हटले आहे.
आतापर्यंत 22 कारखाने बंद
सध्यस्थितीत देशातील गाळप सुरु असलेल्या कारखान्यांची संख्या 505 इतकी आहे. इतकेच नाही तर उत्पादनात घट नोंदवली गेलेली असताना सध्यस्थितीत आघाडीच्या ऊस उत्पादक राज्यांमध्ये जवळपास 22 साखर कारखान्यांनी उसाअभावी आपले चालू हंगामातील गाळप थांबवले आहे. यामध्ये प्रामुख्याने महाराष्ट्र आणि कर्नाटक या राज्यांचा समावेश असून, आतापर्यंत या दोन राज्यांमधील एकूण 22 कारखान्यांनी आपले गाळप थांबवले, असल्याचे ‘इंडियन शुगर एंड बायो-एनर्जी मैन्युफैक्चरर्स असोसिएशन’ने म्हटले आहे.
दरम्यान, यावर्षी साखरेचे उत्पादन हंगामाच्या सुरुवातीच्या अधिक घटलेले पाहायला मिळत होते. मात्र, त्यानंतरच्या काळात डिसेंबर महिन्याच्या सुरुवातिला केंद्र सरकारने इथेनॉल निर्मितीवर बंधने घातली. ज्यामुळे इथेनॉल निर्मितीसाठी वापरला जाणारा ऊस साखर उत्पादनासाठी वळता झाला. परिणामस्वरूप नोव्हेंबर महिन्यात 11 टक्के असलेली साखर उत्पादनातील तूट सध्या 5 टक्क्यांपर्यंत खाली आली आहे.