Sugar Production : राज्यात आतापर्यंत 70.44 लाख टन साखर उत्पादन; ऊस गाळपात घट!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : देशातील आघाडीचे ऊस उत्पादक राज्य असलेल्या महाराष्ट्रात यावर्षीच्या गाळप हंगामात (Sugar Production) आतापर्यंत (५ फेब्रुवारी २०२४) एकूण 70.44 लाख टन साखर उत्पादन झाले आहे. मागील वर्षीच्या गाळप हंगामात याच कालावधीत 78.67 लाख टन साखर उत्पादन नोंदवले गेले होते. अर्थात यावर्षी साखर उत्पादनात (Sugar Production) 8.23 लाख टन इतकी घट नोंदवली गेली आहे. अशी माहिती राज्याच्या साखर आयुक्तालयाकडून जारी करण्यात आली आहे.

ऊस गाळपातही घट (Sugar Production In Maharashtra)

राज्यातील 207 साखर कारखान्यांनी आतापर्यंत 726.53 लाख टन उसाचे गाळप केले आहे. मागील वर्षी याच कालावधीत कारखान्यांनी 805.15 लाख टन उसाचे गाळप केले होते. अर्थात यावर्षी गाळपात 78.62 लाख टनांची घट नोंदवली गेली आहे. इतकेच नाही तर यावर्षी राज्यातील कारखान्यांना 9.5 टक्के इतका साखर उतारा मिळाला आहे. जो मागील वर्षीच्या हंगामात 9.7 टक्के इतका नोंदवला गेला होता.

चार कारखान्यांनी गाळप थांबवले

5 फेब्रुवारी 2024 पर्यंत राज्यात 207 कारखान्यांचे गाळप सुरु आहे. मागील वर्षीच्या हंगामात 208 कारखान्यांचे गाळप सुरु होते. सध्याच्या घडीला राज्यातील चार साखर कारखान्यांनी परिसरातील ऊस पुरवठा थांबल्याने आपले गाळप थांबवले आहे. यात सोलापुरातील एक, छत्रपती संभाजीनगर येथील एक आणि नांदेड जिल्ह्यातील दोन कारखान्यांनी आपले गाळप बंद केले आहे.

यावर्षीच्या हंगामाच्या सुरुवातीला ऊस उत्पादनात घटीची शक्यता व्यक्त केली जात होती. मात्र नोव्हेंबर महिन्याच्या शेवटी झालेला अवकाळी पाऊस पावसामुळे ऊस उत्पादनाला काहीसा आधार मिळाला आहे. त्यामुळे हंगाम काहीसा लांबला असून, एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापर्यंत गाळप सुरु राहणार असल्याची शक्यता व्यक्त होत आहे. तर केंद्र सरकारनेही इथेनॉल निर्मितीवर निर्बंध लागू केल्याने, तो ऊसही साखर उत्पादनाकडे वळता झाला आहे. एकूणच राज्यातील साखर उत्पादनाला आधार मिळाल्याने, यंदा 95 लाख टन इतके साखर उत्पादन होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

error: Content is protected !!