हॅलो कृषी ऑनलाईन : 2023-24 यावर्षीच्या गाळप हंगामाच्या (Sugar Production) पहिल्या दोन महिन्यांमध्ये (ऑक्टोबर-नोव्हेंबर) देशातील साखर उत्पादनात 10.65 टक्क्यांनी घट झाली आहे. यावर्षी आतापर्यंत देशात 43.20 लाख टन साखरेचे उत्पादन (Sugar Production) झाले आहे. जे मागील वर्षी याच कालावधीत 48.35 लाख टन इतके नोंदवले होते. अर्थात मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी 5.15 लाख टनांनी साखर उत्पादनात घट झाली आहे. अशी माहिती देशातील सहकारी साखर कारखान्यांची शिखर संस्था असलेल्या नॅशनल फेडरेशन ऑफ को-ऑपरेटिव्ह शुगर फॅक्टरीज लिमिटेडकडून जाहीर करण्यात आली आहे.
महाराष्ट्र आणि कर्नाटकमध्ये पावसाअभावी साखर उत्पादनात (Sugar Production) झालेल्या घटीमुळे देशातील एकूण साखर उत्पादनात घट झाल्याचे या शिखर संस्थेने म्हटले आहे. महाराष्ट्रात यावर्षी आतापर्यंत केवळ 13.50 लाख टन साखर उत्पादन होऊ शकले आहे. जे मागील वर्षी याच कालावधीत 20.25 लाख टन नोंदवले गेले होते. तर कर्नाटकामध्येही सध्यस्थितीत साखर उत्पादन मागील वर्षीच्या 12.15 लाख टनांवरून, 11 लाख टनांपर्यंत खाली घसरले आहे. दरम्यान ३० नोव्हेंबरपर्यंत देशभरात 433 साखर कारखान्यांनी आपले गाळप सुरु केले असून, या कारखान्यांनी आतापर्यंत 511.02 लाख टन उसाचे गाळप केले आहे. मागील वर्षी याच कालावधीत 451 कारखाने सुरु झाले होते. असेही नॅशनल फेडरेशन ऑफ को-ऑपरेटिव्ह शुगर फॅक्टरीज लिमिटेडने म्हटले आहे.
उत्तरप्रदेशातील उत्पादनात वाढ (Sugar Production In India)
उत्तरप्रदेशातील साखर उत्पादनात यावर्षी वाढ झाली असून, तेथील साखर कारखान्यांनी आतापर्यंत 13.05 लाख टन साखर उत्पादन केले आहे. जे मागील वर्षी याच कालावधीत 10.60 लाख टन इतके नोंदवले गेले होते. उत्तरप्रदेशात आतापर्यंत 110 कारखान्यांनी आपले गाळप सुरु केले असून, त्यांनी 144.20 लाख टन उसाचे गाळप केले आहे. त्याद्वारे कारखान्यांना 9.05 टक्के इतका सर्वाधिक साखर उतारा मिळाला आहे.
साखर उताऱ्यातही युपीची आघाडी
देशातील सरासरी साखर उतारा देखील 0.2 टक्क्यांनी कमी झाला आहे. दरम्यान, देशातील आतापर्यंतच्या सरासरी साखर उताऱ्यामध्येही उत्तर प्रदेशने 9.05 टक्के उतारा घेऊन आघाडी घेतली आहे. त्यापाठोपाठ कर्नाटक राज्याचा सरासरी साखर उतारा 8.50 टक्के राहिला असून, महाराष्ट्राला मात्र सरासरी साखर उतारा 7.85 टक्के इतकाच मिळाला आहे.