हॅलो कृषी ऑनलाईन : महाराष्ट्र आणि कर्नाटक या आघाडीच्या राज्यांमध्ये पावसाअभावी यंदा ऊस पिकाला (Sugar Production) मोठा फटका बसला. त्यामुळे आता मोठ्या कालावधीनंतर देशातील साखर उत्पादन (Sugar Production) हे ३०० लाख टनांच्या खाली घसरणार आहे. ज्यामुळे साखरेच्या मागणी आणि पुरवठ्याचे गणित बिघडून दरातील जटिलता कायम राहणार आहे.
साखर उद्योगातील संघटनांच्या आकडेवारीनुसार 2022-23 मध्ये देशातील साखरेचे उत्पादन (Sugar Production) 331 लाख टन नोंदवले गेले होते. 2021-22 या वर्षात ते 358 लाख टन इतके विक्रमी नोंदवले गेले होते. ज्यात आता 41 लाख टनांनी घसरण होऊन, ते यावर्षी 290 लाख टनांपर्यंत घसरणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तर मागील दोन वर्षांचा विचार करता साखर उत्पादनात 68 लाख टन इतकी मोठी घट नोंदवली जाऊ शकते. त्यामुळे मागणी आणि पुरवठ्यातील तफावत वाढल्यास, यावर्षी देशातील साखर निर्यातीची शक्यता पूर्णपणे मावळली आहे. जागतिक बाजारात साखरेच्या किमती सध्या तेजीत आहेत.
उत्तरप्रदेशात यंदा विक्रमी उत्पादन (Sugar Production Decreases In India)
दिलासादायक बाब म्हणजे यावर्षी उत्तरप्रदेशातील साखर उत्पादन हे मागील वर्षीच्या तेथील उत्पादनापेक्षा अधिक असणार आहे. उत्तरप्रदेशात यावर्षी 110 लाख टन साखर उत्पादन होण्याची शक्यता आहे. जे मागील वर्षी 104.80 लाख टन इतके नोंदवले गेले होते. मात्र, महाराष्ट्रातील साखर उत्पादनात यंदा 20 लाख टनांनी घट होऊन, ते 85 लाख टन इतके होण्याची शक्यता आहे. मागील वर्षी राज्यात 105.30 लाख टन इतके साखर उत्पादन नोंदवले गेले होते. तर कर्नाटकातही यावर्षी साखर उद्योगाला मोठी आपटी बसणार असून, तेथील साखर उत्पादन जवळपास 36 टक्क्यांनी घटणार आहे. यावर्षी कर्नाटकात 38 लाख टन साखर उत्पादन होण्याची शक्यता आहे. जे मागील वर्षी 59.80 लाख टन इतके नोंदवले गेले होते.
मागील वर्षापर्यंत महाराष्ट्र देशातील प्रमुख साखर उत्पादक राज्य होते. तर उत्तरप्रदेश दुसऱ्या आणि कर्नाटक तिसऱ्या क्रमांकावर होते. मात्र आता उत्तरप्रदेश महाराष्ट्राला मागे टाकत सार्वधिक साखर उत्पादक राज्य ठरण्याची शक्यता या आकड्यांवरून जोर धरू लागली आहे. तामिळनाडू मध्येही साखर उत्पादन घटणार आहे. मात्र, यावर्षी गुजरातमध्ये मागील वर्षीच्या तुलनेत साखर उत्पादनात सुधारणा होण्याची शक्यता आहे.