Sugar Production : अंतिम टप्प्यात महाराष्ट्राचा साखर उत्पादनात दबदबा; युपीलाही टाकले मागे!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : 2023-24 या चालू वर्षीच्या गाळप हंगामात देशातील साखर उत्पादनात (Sugar Production) मागील वर्षीच्या तुलनेत घट होण्याची शक्यता आहे. यावर्षी देशभरात एकूण 32 दशलक्ष टन (320 लाख टन) साखर उत्पादन होण्याची शक्यता आहे. जे मागील वर्षीच्या गाळप हंगामात नोंदवल्या गेलेल्या 32.9 दशलक्ष टन (329 लाख टन) या साखर उत्पादनापेक्षा (Sugar Production) काहीसे कमी आहे. असे ऑल इंडिया शुगर ट्रेडर्स एसोसिएशनने म्हटले आहे.

उत्तरप्रदेशात उत्पादन घटणार (Sugar Production In India)

प्रामुख्याने यावर्षीच्या गाळप हंगामात उत्तरप्रदेश या राज्यात मागील वर्षीच्या तुलनेत साखर उत्पादन (Sugar Production) घटणार आहे. उत्तरप्रदेशात यावर्षी 10.6 दशलक्ष टन (106 लाख टन) साखर उत्पादन होण्याची शक्यता आहे. जे मागील वर्षीच्या गाळप हंगामात 11.7 दशलक्ष टन (117 लाख टन) नोंदवले गेले होते. याशिवाय महाराष्ट्रासोबतच कर्नाटकमध्ये देखील साखर उत्पादनात घट होण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. मात्र, कर्नाटकातील हंगामाच्या सुरुवातीला व्यक्त करण्यात आलेल्या 47 लाख टन अंदाजापेक्षा, यंदा कर्नाटकात साखर उत्पादन 51 लाख टन इतके होण्याची शक्यता आहे.

उत्पादनात महाराष्ट्राचा दबदबा

दरम्यान, यापूर्वीच्या अंदाजांमध्ये हंगामाच्या सुरुवातीला महाराष्ट्रातील साखर उत्पादन (Sugar Production) हे मागील वर्षीच्या तुलनेत काहीसे घटणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यानुसार यंदाच्या हंगामात राज्यातील साखर उत्पादन 95 लाख टनांच्या आसपास राहण्याची शक्यता वर्तवली जात होती. मात्र मार्चअखेरपर्यंत राज्यात 106 लाख टन साखर उत्पादन नोंदवले गेले असून, यावर्षीच्या एकूण हंगामात महाराष्ट्रातील साखर उत्पादन 108 लाख टनांपर्यंत पोहचण्याची शक्यता असल्याचे ऑल इंडिया शुगर ट्रेडर्स एसोसिएशनने म्हटले आहे.

अन्य राज्यांचे उत्पादन

ऑल इंडिया शुगर ट्रेडर्स एसोसिएशनच्या आकडेवारीनुसार, महाराष्ट्र, उत्तरप्रदेश आणि कर्नाटक या राज्याव्यतिरिक्त पंजाब, हरियाणा, आंध्रप्रदेश, तेलंगणा, उत्तराखंड या चार राज्यांमध्ये एकूण 33 लाख टन साखर उत्पादन होण्याची शक्यता आहे. जे मागील वर्षीच्या हंगामात 31 लाख टन इतके नोंदवले गेले होते. तर दक्षिणेकडील तामिळनाडू या राज्यात देखील मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी 0.3 दशलक्ष टन साखर उत्पादन कमी राहण्याची शक्यता आहे.

error: Content is protected !!