Sugar Production : साखर उत्पादनात महाराष्ट्राची मक्तेदारी; सलग तिसऱ्या वर्षी युपीला मागे टाकले!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : साखर उत्पादनात (Sugar Production) महाराष्ट्राने आपली मक्तेदारी कायम ठेवली आहे. सलग तिसऱ्या वर्षी ११० लाख मेट्रिक टनांपेक्षा अधिक साखरेचे उत्पादन करत, अव्वल स्थान पटकावले आहे. उत्तर प्रदेशात १०५ लाख मेट्रिक टन साखर उत्पादन होणे अपेक्षित आहे. वर्षांच्या सुरुवातीला झालेला पाऊस आणि इथेनॉल निर्मितीवरील निर्बंधांमुळे साखरेच्या उत्पादनात (Sugar Production) मुळ अंदाजापेक्षा १५ ते २० टक्क्यांनी वाढ झाली असल्याचे सहकार विभागातील अधिकाऱ्याने म्हटले आहे.

अंदाजापेक्षा उत्पादन अधिक (Sugar Production In Maharashtra)

गतवर्षी पावसाची अनियमितता आणि वातावरणातील बदलामुळे उसाच्या पिकावर परिणाम झाला होता. त्यामुळे राज्यात हंगामाच्या सुरुवातीस ८५ लाख मेट्रीक टन तर सुधारित अंदाजानुसार ९५ लाख मेट्रीक टन साखरेचे उत्पादन (Sugar Production) होईल, असा अंदाज वर्तविण्यात आला होता. राज्याप्रमाणे देशातही साखरेचे उत्पादन घटण्याची शक्यता केंद्राने वर्तविली होती. त्यामुळे २०२३-२४ चा गाळप हंगाम सुरू होताच, डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात केंद्राने उसाच्या रसापासून इथेनॉल निर्मितीवर बंदी घातली. परिणामी, साखरेचे उत्पन्न वाढले.

२०१ कारखाने आतापर्यंत बंद

राज्यात हंगाम घेतलेल्या २०७ पैकी २०१ कारखान्यांनी आपले गाळप थांबवले आहे. ५ ते ६ साखर कारखान्यांचे गाळप सुरू असून, या महिनाअखेरपर्यंत हळूहळू सर्व हे कारखाने बंद होतील, असे सांगण्यात येत आहे. आतापर्यंत ११० लाख टन साखरेचे उत्पादन झाले असून, यात आणखी वाढीची अपेक्षा आहे. राज्यात मराठवाड्यात विशेषतः धाराशिव, नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत नोव्हेंबर महिन्यात अवकाळी पाऊस पडला होता, सोलापूर व मराठवाडयातील जिल्ह्यांत ऊस गाळप वाढल्याचे साखर आयुक्त कार्यालयाकडून सांगण्यात आले.

गाळपासोबत उताराही वाढला

राज्यात यंदाच्या हंगामात ऊस गाळप १०६७ लाख मेट्रिक टन, तर १०९४ लाख क्विंटल साखर तयार झाली आहे. साखर आयुक्त कार्यालयाने सुरुवातीला १० टक्के साखर उतारा पडेल असे गृहीत धरले होते प्रत्यक्षात १०.२५ टक्के इतका उतारा पडला आहे. मागील वर्षी २११ साखर कारखान्यात १०५३.७१ मेट्रिक टन गाळप व १०५२.३ लाख क्विंटल साखर तर १० टक्के उतारा पडला होता.

error: Content is protected !!