हॅलो कृषी ऑनलाईन : २०२३-२४ ऊस गाळप हंगामात साखरेचे उत्पादन अंदाजे ३३७ लाख टन इतके होण्याचा अंदाज आहे. जे मागील वर्षीच्या २०२२-२३ च्या हंगामातील ३६६ लाख टनांपेक्षा कमी असणार आहे. अशी माहिती भारतीय सहकारी साखर कारखाना महासंघाकडून (इस्मा) देण्यात आली आहे. इस्माकडून नुकताच यावर्षीच्या साखर उत्पादनाचा (Sugar Production) अंदाजित अहवाल जाहीर करण्यात आला. यामध्ये म्हटले आहे की, भारताचा सरासरी देशांतर्गत साखरेचा वापर सुमारे २७८.५ लाख टन इतका आहे, जो यावर्षीच्या उत्पादन आणि मागणी यांच्यात अनुकूल संतुलन साधतो. त्यामुळे यंदाचे देशातील साखर उत्पादन आशाजनक असल्याचेही इस्माने म्हटले आहे. सरकारकडून वार्षिक इथेनॉल खरेदी मूल्य जाहीर करण्यात आल्यानंतरच इथेनॉल निर्मिती बाबत बोलले जाऊ शकते, असेही इस्माकडून सांगण्यात आले आहे.
केंद्र साखर निर्यातीवर बंदी घालण्याची शक्यता- Sugar Production
तर महाराष्ट्र राज्य सहकारी साखर कारखाना संघाच्या माहितीनुसार, महाराष्ट्रातही येत्या गाळप हंगामात (२०२३-२४) साखर उत्पादन तब्बल १४ टक्के घटण्याची शक्यता आहे. गेल्या ४ वर्षांतील हा नीचांक असेल. ऑगस्ट महिन्यात मान्सूनचा मोठा खंड पडल्याने आणि सप्टेंबर महिन्यातही सरासरी पाऊस न झाल्याने ऊस उत्पादनाला फटका बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे गाळपाला कमी ऊस उपलब्ध होऊन साखर उत्पादन घसरण्याची चिन्हे आहेत. महाराष्ट्र राज्य साखर उत्पादनात देशात अग्रेसर आहे. महाराष्ट्रात साखर उत्पादनात (Sugar Production) मोठी घट झाल्यास देशातील एकूण साखर उत्पादनात मोठी तूट येईल. त्यामुळे अन्न महागाईत वाढ होईल. वाढत्या महागाईमुळे चिंतेत असलेलं केंद्र सरकार अशा परिस्थितीत साखर निर्यातीवर बंदी घालण्याची शक्यता आहे.
दरम्यान यावर्षी देशातील ऊस उत्पादन ४३४.७ मिलियन टन इतके राहण्याची शक्यता आहे. जे मागील वर्षी याच कालावधीत ४९०.५३ मिलियन टन इतके नोंदवले गेले होते. उत्तर प्रदेश व उत्तरेकडील इतर राज्यांत ऊस उत्पादन चांगले राहील. असेही सांगितले जात आहे. मात्र महाराष्ट्राच्या ऊस उत्पादनात मोठी घट पाहायला मिळेल आणि साखर निर्मितीवर सुद्धा याचा परिणाम होईल.