Sugarcane : राज्यात 441 लाख टन उसाचे गाळप; 13,056 कोटी शेतकऱ्यांना सुपूर्द!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : यावर्षीच्या ऊस (Sugarcane) गाळप हंगामात राज्यात सध्या 202 साखर कारखान्यांकडून उसाचे गाळप सुरु आहे. त्या माध्यमातून राज्यात आतापर्यंत 441.01 लाख टन ऊस गाळप करण्यात आला आहे. उपलब्ध माहितीनुसार, या उसाची एकूण किंमत ही 13,642 कोटी रुपये इतकी आहे. मात्र यातील केवळ 13,056 कोटी रुपये हे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना कारखान्यांकडून देण्यात आले आहे. ही रक्कम एकूण देय रकमेच्या 96 टक्के इतकी आहे. अर्थात राज्यातील साखर कारखान्यांनी (Sugarcane) शेतकऱ्यांना 586 कोटी रुपयांची थकबाकी देणे बाकी आहे.

117 कारखान्यांकडून पैसे नाहीच (Sugarcane 13,056 Crore To Farmers)

उपलब्ध आकडेवारीनुसार, राज्यातील एकूण 202 साखर कारखान्यांपैकी 85 साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांना एफआरपीची पूर्ण रक्कम दिली आहे. तर 50 असे कारखाने आहेत ज्यांनी शेतकऱ्यांना ऊस एफआरपीची 60 ते 80 टक्के इतकी रक्कम दिलेली आहे. तर 117 कारखान्यांनी चालू हंगामात अजूनही शेतकऱ्यांना त्यांच्या उसाचे पैसे दिलेले नाही. त्यामुळे राज्यातील ऊस उत्पादक शेतकरी संघटनांकडून नाराजीचा सूर उमटत असून, साखर कारखान्यांनी लवकरात लवकर थकबाकीची पैसे शेतकऱ्यांना द्यावेत, अशी मागणी केली जात आहे. साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांना उसाचे पैसे वेळेत सुपूर्द केल्यास त्यांना पुढील पिकाचे नियोजन करण्यास मदत होईल, असे आवाहनही ऊस उत्पादक शेतकरी संघटनांकडून साखर कारखान्यांना केले जात आहे.

कारखान्यांना उसाची कमतरता

दरम्यान, कर्नाटक-महाराष्ट्र सीमेवरील काही कारखान्यांनी शेतकऱ्यांना ऊस उत्पादनाच्या कमतरतेमुळे अन्य भागात ऊस गाळपास न नेण्याचे आवाहन केले आहे. याशिवाय विदर्भ आणि मराठवाड्यातील काही कारखान्यांनाही सध्या उसाची कमतरता जाणवत आहे. यावर्षी झालेला अपुरा पाऊस आणि एल निनोच्या प्रभावामुळे ऊस या बारमाही पिकाला मोठा फटका बसला आहे. यामुळे त्याचा एकूणच साखर उद्योगावर परिणाम झाला असून, शेतकऱ्यांना साखर कारखान्यांकडून उसाच्या एफआरपीचे पैसे मिळण्यास विलंब होत आहे.

error: Content is protected !!