हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातील ऊस (Sugarcane) गाळप हंगाम शेवटाला आला असून, आता काही कारखान्यांनी आपले गाळप थांबवणे सुरु केले आहे. साखर आयुक्तालयाच्या माहितीनुसार, यावर्षीच्या ऑक्टोबर 2023- नोव्हेंबर 2024 च्या ऊस गाळप हंगामात राज्यातील आतापर्यंत 8 साखर कारखान्यांनी आपले गाळप थांबवले आहे. आपल्या भागातील प्रभाव क्षेत्रातून अपेक्षित ऊस (Sugarcane) मिळत नसल्याने, या कारखान्यांनी आपले गाळप थांबवले आहे.
884.46 लाख टन उसाचे गाळप (Sugarcane Sugar Production In Maharashtra)
यावर्षीच्या हंगामाच्या सुरुवातीला राज्यातील एकूण 207 साखर कारख्यान्यांनी आपले गाळप सुरु केले होते. यामध्ये 103 सहकारी साखर कारखान्यांचा तर 104 खासगी साखर कारखान्यांचा समावेश आहे. यावर्षी सर्व साखर कारखान्यांनी आतापर्यंत एकूण 884.46 लाख टन उसाचे (Sugarcane) गाळप केले असून, त्याद्वारे राज्यात एकूण 884.49 लाख क्विंटल (88.44 लाख टन) साखर उत्पादित झाली आहे.
5.96 लाख टनांनी पिछाडीवर
मागील वर्षी याच कालावधीत जवळपास 211 साखर कारखान्यांचे गाळप सुरु होते. इतकेच नाही तर मागील वर्षी फेब्रुवारी महिन्याच्या शेवटापर्यंत या साखर कारखान्यांनी 953.06 लाख टन उसाचे गाळप केले होते. ज्याद्वारे मागील वर्षीच्या हंगामात याच कालावधीत राज्यात एकूण 944.03 लाख क्विंटल (94.40 लाख टन) साखर उत्पादित झाली होती. अर्थात यावर्षी राज्यातील साखरेचे उत्पादन 5.96 लाख टनांनी पिछाडीवर आहे.
10 टक्के साखर उतारा
दरम्यान साखर आयुक्तालयाच्या आकडेवारीनुसार, 2023-24 गाळप हंगामात आतापर्यंत (26 फेब्रुवारी) साखर कारखान्यांना 10 टक्के साखर उतारा मिळवण्यात यश आले आहे. जो मागील वर्षीच्या हंगामात याच कालावधीपर्यंत 9.91 टक्के इतका नोंदवला गेला होता. तर राज्यातील बंद झालेल्या 8 साखर कारखान्यांमध्ये प्रामुख्याने कोल्हापूर विभागातील एक, सोलापूर विभागातील एक, पुणे विभागातील एक, अहमदनगर विभागातील एक, संभाजीनगर विभागातील तीन आणि नांदेड विभागातील एक साखर कारखान्याचा समावेश आहे.