‘स्वाभिमानी’ची ऊस परिषद 15 ऑक्टोबरला, ‘जागर एफआरपीचा’ अभियान

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : यंदाच्या वर्षीचा ऊस गाळप हंगाम १५ ऑक्टोबर पासून सुरु करण्यात येणार आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने ऊस हंगामाची दिशा ठरवण्यासाठी १५ ऑक्टोबर रोजी कोल्हापूर जिल्ह्यातील जयसिंगपूर येथे ऊस परिषद होणार आहे. अशी माहिती संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांनी दिली आहे.

‘जागर एफआरपीचा’ अभियान

याबाबत बोलताना शेट्टी म्हणाले, ‘‘चार वर्षांपासून एफआरपीचा दर २७०० ते २९०० इतका आहे, मात्र खतांचे वाढलेले दर, मजुरी लक्षात घेता आता एफआरपीची रक्कम वाढवून मिळणे आवश्यक आहे. केंद्र सरकारने एफआरपीच्या रकमेत जी वाढ केली ती तोडणी, ओढणीमध्येच संपते. आंतरराष्ट्रीय बाजारात भारताच्या साखरेची मागणी वाढल्याने मोठ्या प्रमाणात साखर निर्यात झाली आहे.

तसेच इथेनॉल आणि कच्च्या साखरेचे दरही अधिक आहेत. ब्राझीलमध्ये यंदा उसाचे उत्पादन कमी झाले आहे. त्यामुळे पुढील वर्षात भारताच्या साखरेला जागतिक बाजारात चांगली मागणी असेल. हे सर्व पाहता साखर कारखान्यांना वाढीव एफआरपी देणे शक्य आहे. तसेच कारखाने जी उपउत्पादने बनवतात, त्याचीची रक्कम शेतकऱ्यांना मिळणे आवश्यक आहे. त्यामुळे आता वाढीव एफआरपी अधिक किती रक्कम हे १५ ऑक्टोबरला होणाऱ्या ऊस परिषदेत ठरेल.

खतांचे आणि मजुरीचे वाढलेले दर आणि साखर कारखान्यांना झालेला नफा लक्षात घेऊन एफआरपी (रास्त आणि किफायतशीर दर)ची रक्कम अधिक मिळावी, अशी आमची मागणी असणार आहे. तसेच एफआरपीची रक्कम का वाढवून मिळावी यासाठी ९ ठिकाणी ‘जागर एफआरपीचा’ हे अभियान घेऊन या बाबत शेतकऱ्यांना जागरूक केले जाणार आहे.

शेतकऱ्यांच्या बाबतीत सगळेच पक्ष लुच्चे

या बाबत प्रबोधन करण्यासाठी ‘जागर एफआरपीचा’ हे अभियान राबवले जाणार आहे. महाविकास आघाडीने एकरकमी एफआरपी न देण्याबाबतचा निर्णय घेतला होता. त्यानंतर राज्यात सत्ताबदल झाला. नव्या सरकारने महाविकास आघाडीचे सर्व निर्णय रद्द केले. फक्त एकरकमी एफआरपीचा निर्णय रद्द केला नाही. शेतकऱ्यांच्या बाबतीत सगळेच पक्ष लुच्चे आहेत, असे शेट्टी म्हणाले.

 

error: Content is protected !!