हॅलो कृषी ऑनलाईन । येत्या गाळप हंगामात राज्यात सोलापूर जिल्ह्यात गाळपासाठी सर्वाधिक दोन लाख ४० हजार ९५७ हेक्टर क्षेत्रातील ऊस उपलब्ध आहे. मागील हंगामाच्या तुलनेत यंदा त्यामध्ये सुमारे १० हजार हेक्टरने वाढ झाली आहे. गेल्यावर्षी जिल्ह्यात ३७ कारखान्यांनी गाळप हंगाम घेतला होता. यावर्षी सोलापूर जिल्ह्यात अजूनही चांगला पाऊस झालेला नाही. त्याची झळ ऊस पिकाला बसली आहे. त्यामुळे उसाचे एकरी टनेज घटण्याची शक्यता आहे.
गेल्या हंगामात राज्यात १४ लाख ८७ हजार ८३६ हेक्टर क्षेत्रातील उसाचे गाळप होऊन १०५३.९१ लाख टन साखर उत्पादन झाले होते. यंदा राज्यात १४ लाख ३७ हजार २१ हेक्टर क्षेत्रातील ऊस गाळपास उपलब्ध आहे. यंदा पावसाने दिलेला दगा, त्यामुळे उसाची खुंटलेली वाढ, पाण्याअभावी वाळलेले उसाचे मळे, जनावरांच्या चाऱ्यासाठी उसाचा झालेला वापर या कारणाने गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी उसाच्या क्षेत्रात सुमारे ५१ हजार हेक्टरने घट संभवते.
पुणे, अहमदनगर, औरंगाबाद, नांदेड, अमरावती व नागपूर या विभागात उसाचे क्षेत्र घटले आहे. अहमदनगर विभागात सर्वाधिक २५ हजार ८११ हेक्टरची घट आहे. त्यानंतर नांदेड विभागात २२ हजार ४७१ हेक्टर, औरंगाबाद विभागात १४ हजार ७९ हेक्टर, पुणे विभागात १४ हजार ३२ हेक्टर, अमरावती विभागात दोन हजार ६७१ हेक्टर तर नागपूर विभागात एक हजार २६४ हेक्टर उसाचे क्षेत्र कमी आहे. कोल्हापूर विभागात उसाच्या क्षेत्रात १७ हजार ८०७ तर सोलापूर विभागात ११ हजार ७०७ हेक्टरने वाढ झालेली दिसते.