हॅलो कृषी ऑनलाईन : अलीकडेच राज्यातील सर्व साखर कारखान्यांनी ऊस तोडणी व वाहतुकीसाठीचे आपले दर (Sugarcane) निश्चित करून साखर आयुक्तालयात सादर केले होते. मात्र यात ऊस तोडणीसाठी प्रती टन 410 रुपये (Sugarcane) देण्याची मागणी ऊस तोडणी कामगार संघटनांनी केली आहे. मात्र राज्य सहकारी साखर संघाने या मागणीस विरोध दर्शवला आहे. त्यामुळे येत्या दहा दिवसांत मागणी पूर्ण न झाल्यास 25 डिसेंबरपासून ‘कोयता बंद’ आंदोलन करू, असा इशारा सर्व ऊस तोडणी संघटनांनी दिला आहे.
मजुरीत ५० टक्के वाढीची मागणी (Sugarcane cutting laborers on strike)
राज्यात सध्या ऊस तोडणीसाठी (Sugarcane) प्रति टन 273 रुपये 10 पैसे दिले जातात. या ऊस तोडणीच्या दरात 50 टक्के वाढ करण्यात यावी. अशी मागणी कामगार संघटनांनी केली आहे. ऊस तोडणीसाठी मजुरांना प्रति टन 410 रुपये मजुरी देण्यात यावी. असे संघटनेचे म्हणणे आहे. तर राज्य सहकारी संघाने मजुरीमध्ये 27 टक्के वाढ करण्यास सहमती दर्शविली आहे. मात्र कोणताही ठोस निर्णय न झाल्याने ऊस तोडणी मजूर संघटनांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. येत्या दहा दिवसांत मजुरीबाबतची मागणी पूर्ण न झाल्यास 25 डिसेंबरपासून ‘कोयता बंद’ आंदोलन करू, असेही ऊसतोड कामगार संघटनांनी या बैठकीत म्हटले आहे. या बैठकीला राज्य सहकारी साखर महासंघाचे अध्यक्ष पी. आर. पाटील, राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर, माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील आणि ऊसतोड कामगार संघटनांचे डॉ. डी. एल. कराड, दत्ता डहाके, सुखदेव सानप, प्रा. सुशीला मोराळे, दत्तात्रेय भांगे आदी उपस्थित होते.
हंगामास आडकाठीचे ग्रहण
दरम्यान यावर्षी ऊस उत्पादनात (Sugarcane) आधीच घट होणार असल्याचे सांगितले जात आहे. तर हंगामाच्या सुरुवातीपासून कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात ऊस दरावरून स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आपले आंदोलन सुरु ठेवले आहे. परिणामी यावर्षीच्या गाळप हंगामाला मोठा फटका आहे. त्यातच आता ऊस तोड कामगारांनी कामबंद आंदोलन केल्यास, ऊस गाळपात मोठी घट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे साखर कारखान्यांसह ऊस उत्पादक शेतकऱ्यांनाही मोठा फटका बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे यंदा सुरुवातीपासून ऊस गाळपास आडकाठीचे ग्रहण लागले असल्याचे बोलले जात आहे.