हॅलो कृषी ऑनलाईन : सधन ऊस पट्टा (Sugarcane) म्हणून ओळख असलेल्या कोल्हापूर आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसामुळे ऊस तोडणी ठप्प झाली आहे. पुढील आठवडाभर तरी उस तोडणी (Sugarcane) होऊ शकणार नाही, अशी परिस्थिती या दोन जिल्ह्यांमध्ये पाहायला मिळत आहे. रस्त्याच्या कडेचा ऊस तोडण्यासाठी प्रयत्न झाले तरीही उसाने भरलेली वाहने बाहेर काढण्यासाठी शेतकऱ्यांना मोठी कसरत करावी लागणार आहे. त्यातच आता नव्याने निर्माण होत असलेल्या चक्रीवादळाने शेतकऱ्यांची चिंता वाढवली आहे. त्यामुळे या भागातील ऊस तोडणीला मोठा अडथळा निर्माण झाला आहे.
अवकाळी पावसामुळे अनेक ठिकाणी उसाच्या फडामध्ये पावसाचे पाणी शिरल्याने चिखल झाला आहे. काही ठिकाणी तळ्याचे रूप आल्याने ऊसतोडणी यंत्रणा थांबली आहे. उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर, अक्कलकोट, बार्शी, मंगळवेढा आदी भागात मुसळधार अवकाळी पाऊस झाला आहे. तर पंढरपुर परिसरातील पुळूज, कासेगाव, पटवर्धन कुरोली आदी भागात पावसाने ऊसतोड पूर्णपणे थांबली आहे. तर तिकडे कोल्हापूर जिल्ह्यातही अशीच काहीशी परिस्थिती असून, हातकणंगले, शिरोळ तालुक्यात जोरदार पावसामुळे पाणी साचले असून, ऊस तोडणीमध्ये व्यत्यय निर्माण झाला आहे. या दोन्ही जिल्ह्यांमध्ये केवळ 40 टक्के ऊस तोडणी सुरु असल्याचे सांगितले जात आहे. तर यंत्राद्वारे होणारी ऊस तोडणी किमान 15 दिवस तरी सुरु होऊ शकणार नसल्याचे सांगितले जात आहे.
कारखान्यांना मोठा फटका (Sugarcane Cutting Stops In Maharashtra)
यावर्षी पावसाअभावी ऊस पीक म्हणावे असे आलेले नाही. तर गेल्या काही दिवसांपासून दर वाढीसाठीच्या आंदोलनामुळे हंगाम लांबला होता. आंदोलन मागे घेण्यात आल्यानंतर हंगाम सुरळीत होईल, असे वाटत असतानाच आता दोन दिवसांच्या जोरदार पावसाने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. काढणीला आलेला ऊस बाहेर काढायचा कसा? असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर निर्माण झाला आहे. त्यामुळे आता साखर कारखान्यांच्या गळीत हंगामालाही याचा मोठा फटका बसण्याची शक्यता व्यक्त होत आहे.