हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातील कारखान्यांचा यावर्षीचा ऊस तोडणी आणि वाहतूक खर्च (Sugarcane) साखर आयुक्तालयाकडून जाहीर करण्यात आला आहे. यामध्ये सर्वाधिक प्रतिटन 905.71 रुपये खर्च हा सांगली जिल्ह्यातील दालमिया भारत शुगर या कारखान्याने तर सर्वात कमी 656.28 रुपये दर हा वाळवा (सांगली) येथील हुतात्मा कारखान्याने दिला आहे. त्यामुळे आता याआधारे कमी तोडणी व वाहतूक खर्च असलेल्या कारखान्याला गाळपासाठी ऊस पाठवणे शेतकऱ्यांना शक्य होणार आहे.
साखर आयुक्तालयाकडून राज्यातील एकूण १५ कारखान्यांचे ऊस तोडणी आणि वाहतूक खर्च जाहीर (Sugarcane) करण्यात आले असून, ते पुढीलप्रमाणे आहेत. दालमिया भारत शुगर 905.71 रुपये प्रति टन, रायगाव साखर कारखाना 886.80 रुपये प्रति टन, सद्गुरु श्री श्री कारखाना 809.13 रुपये प्रति टन, राजारामबापू तिपेहळ्ळी कारखाना 791.21 रुपये प्रति क्विंटल, राजारामबापू कारंदवाडी कारखाना 734.19 रुपये प्रति टन, राजारामबापू साखराळे कारखाना 733.47 रुपये, राजारामबापू वाटेगाव कारखाना 713.09 रुपये, दत्त भारत कारखाना 755.91 रुपये, श्रीपती शुगर डफळापूर कारखाना 745.95 रुपये, उदगिरी साखर बामणी कारखाना 728.89 रुपये, मोहनराव शिंदे आरग कारखाना 722.09 रुपये, विश्वासराव नाईक कारखाना 717.11 रुपये, सोनहिरा वांगी कारखाना 707.52 रूपये, क्रांती-कुंडल कारखान्याने 697.25 रुपये प्रति टन ऊस तोडणी आणि वाहतुक खर्च जाहीर केला आहे.
संघटनांचा विरोध (Sugarcane Cutting Transport Costs Maharashtra)
दरम्यान, शेतकरी संघटनानी मात्र कारखान्यांच्या खर्चाचा दर ठरवून देण्यास विरोध केला आहे. 25 किलोमीटरच्या आत एक दर आणि 50 किलोमीटरपर्यंत एक अशी विभागणी केली तरच शेतकऱ्यांना फायदा होईल. असे या संघटनांचे म्हणणे आहे. मात्र, कारखान्यांनाकडून वाहतूक आणि तोडणीबाबत हा खर्च जाहीर करण्यात आल्याने कोणत्या कारखान्याला आपला ऊस द्यायचा याचे अवलोकन करण्यासाठी शेतकऱ्यांना मदत होणार आहे. तसेच एफआरपीमधून होणाऱ्या कपातीचा अंदाज येऊ शकणार आहे. असे सांगितले जात आहे.