Sugarcane FRP : 101 कारखान्यांकडून शेतकऱ्यांचे पैसे चुकते? सोलापूरात स्वाभिमानी आक्रमक!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातील ऊस गाळप (Sugarcane FRP) हंगाम सध्या शेवटाला आला असून, सध्या काही साखर कारखान्यांकडून शेतकऱ्यांना त्यांच्या उसाची थकबाकी देण्याबाबत कुचराई केली जात आहे. 15 फेब्रुवारीपर्यंत राज्यातील 206 कारखान्यांनी शेतकऱ्यांच्या एकूण 21,762 कोटींच्या उसाचे गाळप केले आहे. त्यापोटी कारखान्यांकडून ऊस उत्पादक शेतकऱ्यांना आतापर्यंत 21,636 कोटींची रक्कम वितरित करण्यात आली असून, कारखान्यांकडे शेतकऱ्यांची केवळ 126 कोटी रुपयांची थकबाकी असल्याचे साखर कारखान्यांनी (Sugarcane FRP) राज्याच्या साखर आयुक्तालयाला दिलेल्या आकडेवारीत म्हटले आहे.

साखर कारखान्यांची आकडेवारी (Sugarcane FRP For Farmers)

साखर कारखान्यांनी आयुक्तालयाला दिलेल्या आकडेवारीनुसार, यामध्ये प्रामुख्याने 206 कारखान्यांपैकी 101 साखर कारखान्यांनी (Sugarcane FRP) शेतकऱ्यांची 100 टक्के रक्कम चुकती केली आहे. 51 कारखान्यांनी 80 ते 99 रक्कम शेतकऱ्यांना दिली आहे. 32 कारखान्यांनी 60 ते 79.99 टक्के उसाची रक्कम शेतकऱ्यांना वितरित केली आहे. तर राज्यातील 22 साखर कारखान्यांनी 59.99 टक्के थकबाकी शेतकऱ्यांना दिली आहे. असे साखर कारखान्यांनी साखर आयुक्तालयाला दिलेल्या आपल्या आकडेवारीत म्हटले आहे.

1,588 कोटींची थकबाकी शिल्लक

मात्र सरकारी आकडेवारीनुसार, ऊस उत्पादक शेतकऱ्यांना वास्तविक स्वरूपात एफआरपीची (Sugarcane FRP) 20,174 कोटींची रक्कम वितरित करण्यात आली आहे. अर्थात राज्यातील साखर कारखान्यांकडे शेतकऱ्यांच्या उसाची एकूण 1,588 कोटींची थकबाकी शिल्लक आहे. अर्थात राज्यात आतापर्यंत एकूण सर्व कारखान्यांनी केवळ 92.70 टक्के इतकी एफआरपीची रक्कम शेतकऱ्यांना वितरित केलेली आहे.

थकबाकीवरून स्वाभिमानी आक्रमक

दरम्यान, आता याच पार्श्वभूमीवर थकीत एफआरपीबाबत स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून आंदोलनाचे अस्र उगारण्यात आले आहे. थकीत एफआरपीबाबत 14 फेब्रुवारीला साखर सहसंचालकांना स्वाभिमानीकडून निवेदन देण्यात आले असून, 2 मार्चपासून आंदोलन करणार असल्याचे त्यात म्हटले आहे. सोलापूर विभागातील 33 कारखान्यांकडे 15 फेब्रुवारीअखेर 502.32 कोटी रुपये एफआरपीची रक्कम थकीत आहे.सोलापूर विभागात सोलापूर व धाराशिव हे जिल्हे येतात. यावर्षी सोलापूर जिल्ह्यात 35 तर धाराशिव जिल्ह्यात 14 अशा एकूण 49 कारखान्यांनी आपले गाळप सुरु केले होते. यापैकी सोलापुरातील 25 कारखान्यांकडे 413 कोटी तर धाराशिवमधील 8 कारखान्यांकडे एफआरपीचे 90 कोटी रुपये थकीत आहेत. असे संघटनेचे म्हणणे आहे.

error: Content is protected !!