Sugarcane : ऊस दराबाबतची कोंडी फुटणार; झालाय ‘हा’ महत्वाचा निर्णय

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : कोल्हापूर जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी उसाला (Sugarcane) प्रति टन २९५० ते ३००० रुपये दर जाहीर केला आहे. मात्र आता जिल्ह्यातील सर्व साखर कारखान्यांनी उसाला (Sugarcane) प्रतिटन सरसकट ३१०० रुपये दर जाहीर करावा. जेणेकरून ऊस दराबाबतची कोंडी फुटेल, असे आवाहन पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी जिल्ह्यातील साखर कारखान्यांना केले आहे.

कोल्हापूर येथील ताराराणी सभागृहात ऊस दरासंदर्भात आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी खासदार संजय मंडलिक, आमदार सतेज पाटील, आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर, जिल्हाधिकारी राहुल रेखावार, पोलीस अधिक्षक महेंद्र पंडीत, प्रादेशिक सहसंचालक अशोक गाडे, विशेष लेखा परीक्षक धनंजय पाटील आदी उपस्थित होते. यावर्षी पावसाचे प्रमाण कमी असल्याने राज्यातील ऊस उत्पादनात घट झाली आहे. त्यातच चालू हंगामात कारखाने केवळ ९० दिवस गाळप करू शकतील असा अंदाज आहे. परिणामी शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये, यासाठी जिल्ह्यातील शेतकरी संघटनांनीही सामंजस्यपणा घ्यावा. असे आवाहनही हसन मुश्रीफ यांनी यावेळी केले आहे.

समितीचा अहवाल २१ नोव्हेंबरला (Sugarcane Price In Maharashtra)

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या आंदोलनानंतर आता शेतकऱ्यांना मागील वर्षीच्या उसासाठी प्रति टन ४०० रुपये अधिकचे दिले जाणार आहे. यासाठी आयआयटी कानपूरच्या अहवालाप्रमाणे अभ्यास करुन साखर कारखानदार कशा पध्दतीने शेतकऱ्यांना हे अधिकचे पैसे देऊ शकतील, जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली आहे. ही समिती २१ नोव्हेंबरला आपला अहवाल सादर करणार आहे. असेही मुश्रीफ यांनी यावेळी सांगितले. याशिवाय शेतकऱ्यांना अधिकची रक्कम देण्यासाठी कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून साखर कारखान्यांना कर्जपुरवठा केला जाणार आहे. असेही ते यावेळी म्हणाले.

जिल्ह्यातील गाळप हंगाम व्यवस्थित सुरु राहावा. साखर कारखानदारी व्यवस्था मोडकळीस आल्यास शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होईल. अशी भीती आमदार सतेज पाटील यांनी यावेळी व्यक्त केली. तर ऊसाला प्रति टन किमान ३५०० रुपये तसेच गतवर्षीचा दुसरा हप्ता ४०० रुपये देण्यात यावा, अशी मागणी माजी खासदार राजू शेट्टी यांनी या बैठकीत केली आहे. या बैठकीसाठी जिल्ह्यातील सर्व सहकारी-खासगी साखर कारखान्यांचे अध्यक्ष, कार्यकारी संचालक, व्यवस्थापकीय संचालक तसेच विविध शेतकरी संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.

error: Content is protected !!