Sugarcane Rate : स्वाभिमानीकडून उद्या ‘चक्का जाम’ आंदोलन

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून कोल्हापुरातील राष्ट्रीय महामार्गांवर उद्या (ता. 19) ऊस दरवाढीसाठी (Sugarcane Rate) ‘चक्का जाम’ आंदोलन केले जाणार आहे. पालकमंत्री हसन मुश्रीफ आणि साखर कारखान्यांच्या संचालकांसोबत झालेल्या बैठकीत (Sugarcane Rate) कोणताही अंतिम निर्णय न झाल्याने हे ‘चक्का जाम’ आंदोलन केले जाणार आहे. असे स्वाभिमानी शेतकरी संघटनेने म्हटले आहे.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेने मागील वर्षीच्या हंगामातील उसाला अतिरिक्त 400 रुपये प्रति टन तसेच यावर्षी उसाला 3500 रुपये प्रति टन दर देण्याची मागणी लावून धरली आहे. या मागणीसाठी संघटनेकडून रविवारी (ता.19) कोल्हापूर जिल्ह्यातून जाणाऱ्या पुणे-बंगळुरू महामार्गावर (राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 48) आणि नागपूर-रत्नागिरी महामार्गावर (राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 166) हे ‘चक्का जाम’ आंदोलन केले जाणार आहे. याशिवाय कोकणात जाणाऱ्या कोल्हापूर आणि आसपासच्या जिल्ह्यातील मार्गांवरही संघटनेकडून हे आंदोलन केले जाणार आहे.

यावर्षीच्या हंगामात ज्या कारखान्यांनी शेतकऱ्यांच्या उसाला 3 हजार रुपये दर जाहीर केला आहे. त्यांनी सरसकट 3100 रुपये प्रति टन दर जाहीर करावा, असा कारखानदारांकडून प्रस्ताव देण्यात आला आहे. तर गेल्या वर्षीच्या हंगामातील उसाच्या बाबतीत जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करावी आणि २१ तारखेपर्यंत या समितीने या संदर्भामध्ये माहिती सादर करावी, असे सांगण्यात आले आहे. मात्र याला आमचा विरोध आहे. कारण ही समिती वेळ काढू असणार आहे, असे राजू शेट्टी यांनी म्हटले आहे.

ऊस पुरवठ्यात अडथळा (Sugarcane Rate ‘Chakka Jam’ protest Swabhimani)

राज्यात 1 नोव्हेंबरपासून गाळप हंगाम सुरु झाला आहे. मात्र कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक कारखान्यांचे गाळप हे पूर्ण क्षमतेने सुरु होऊ शकले नाही. स्वाभिमानी शेतकरी संघटनेने कोल्हापूर आणि आसपासच्या जिल्यांमध्ये ऊस दराचे आंदोलन तीव्र केल्याने कारखान्यांना ऊस पुरवठा होण्यास अडथळा निर्माण होत आहे. परिणामी याचा जिल्ह्यातील गाळपावर परिणाम होऊन कारखान्यांना मोठा फटका बसला आहे.

पोलीस प्रशासन अलर्टवर

एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून रविवारी करण्यात येणाऱ्या चक्का जाम आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा फौजफाटा अलर्टवर ठेवण्यात आला आहे. कोणत्याही प्रकारे महामार्गांवर गर्दी होऊन वाहतुकीस अडथळा निर्माण होणार नाही, याची काळजी घेतली जाणार आहे. दरम्यान, यापूर्वीच कोल्हापूर जिल्हा प्रशासनाकडून बेकायदा जमाव करण्यास बंदी घालण्यात आली आहे.

error: Content is protected !!