Sugarcane Rate : ‘आपले ठेवायचे झाकून… अन दुसऱ्याचे…”; शेट्टींची जयंत पाटलांवर टीका

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : कोल्हापूरनंतर आता स्वाभिमानी शेतकरी संघटनेने ऊस दरवाढीसाठी (Sugarcane Rate) आपला मोर्चा सांगली जिल्ह्याकडे वळवला आहे. आज खासदार राजू शेट्टी यांनी राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांच्या साखराळे येथील राजारामबापू पाटील साखर कारखान्याच्या (Sugarcane Rate) प्रवेशद्वारासमोर ठिय्या आंदोलन केले. यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक होत उसाच्या गव्हाणीत उड्या मारत ऊस काटा बंद पाडण्याचा प्रयत्न केला.

ऊस दरावर (Sugarcane Rate) तोडगा काढण्यासाठी जयंत पाटील यांच्या राजारामबापू साखर कारखाना प्रशासनासोबत ‘स्वाभिमानी शेतकरी संघटनेची बैठक निष्फळ ठरली आहे. कारखान्याकडून चालू हंगामासाठी 3100 रुपये पहिली उचल आणि मागील हंगामातील उसासाठी प्रति क्विंटल 50 रुपये देण्याचा प्रस्ताव देण्यात आला. मात्र, रिकव्हरी रेटप्रमाणे पहिली उचल 3200 रुपये देण्याच्या मागणीवर राजू शेट्टी यांनी ठाम भूमिका घेत आंदोलनाचे अस्र उपसले आहे. त्यामुळे आज राजू शेट्टी यांनी राजारामबापू कारखान्याच्या प्रवेशद्वारावर खूर्चीवर बसून तंबू ठोकल्याचे पाहायला मिळाले. यावेळी मोठ्या संख्येने शेतकरी आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.

फेसबुक पोस्टद्वारे साधला निशाणा (Sugarcane Rate In Maharashtra)

राजू शेट्टी यांनी याबाबत फेसबुक या समाजमाध्यमावर पोस्ट लिहीत जयंत पाटील यांच्यावर जोरदार टीका केली आहे. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे कि, “विरोधी पक्ष म्हणजे शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसणारा पक्ष झाला आहे. ‘आपले ठेवायचे झाकून आणि दुसऱ्याचे बघायचे वाकून’ ही भूमिका जयंत पाटील यांनी घेतली आहे. त्यांच्याच कारखान्यावर शेतकरी घामाच्या दामासाठी चिखलात बसला आहे. ज्यांनी एफआरपीचे दोन तुकडे करून ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या ताटात माती कालविण्याचे पाप केले. त्यावेळी तुम्ही त्यांना पाठिंबा देत तोंड बंद करून बसलात. आज कारखाना सुरू होऊन जवळपास एक महिना झाला तरीही शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काचे पैसे न देण्यासाठी सत्ताधारी व विरोधी कारखानदारांना एकत्रित करून ऊस उत्पादक शेतकऱ्यांना जेरीस आणले जात आहे. यामुळे ज्यांना स्वत:च्या मतदारसंघातील शेतकऱ्यांचा आक्रोश ऐकू येत नसेल त्यांनी राज्यातील शेतकऱ्यांना न्याय हक्काची लढाई शिकवू नये.” असे राजू शेट्टी यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे. यावेळी शेट्टी यांनी जयंत पाटील यांची शेतकरी जनआक्रोश मोर्चाची पोस्टही फेसबुक शेअर केली आहे.

error: Content is protected !!