हॅलो कृषी ऑनलाईन : सांगली जिल्ह्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आपले ऊस दरासाठीचे (Sugarcane Rate) आंदोलन तीव्र केले आहे. जिल्ह्यातील दत्त इंडिया (वसंतदादा साखर) कारखान्याने ऊस दराबाबत अंतिम निर्णय घेतला आहे. मात्र, शिराळा येथील आरळा येथील निनाईदेवी (दालमिया भारत शुगर) साखर कारखान्याने शनिवारी होणाऱ्या बैठकीत निर्णय घेऊ, असे म्हटले आहे. त्यामुळे आता सांगली जिल्ह्यातील 14 कारखान्यांच्या विरोधात (Sugarcane Rate) स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आंदोलन सुरूच राहणार असल्याचे संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी म्हटले आहे.
36 तासानंतर आंदोलन मागे (Sugarcane Rate In Maharashtra)
सांगली जिल्ह्यातील दत्त इंडिया कारखान्याच्या प्रवेशद्वारावर जवळपास 36 तास आंदोलन केल्यानंतर सोमवारी (ता. 11) जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षेतखाली दूरदृश्यप्रणालीद्वारे बैठक झाली. या बैठकीतही तोडगा निघाला नसल्याने निर्णय होत नाही तोपर्यंत मागे हटणार नाही, अशी भूमिका घेत आंदोलन तीव्र करण्याचा इशारा देत आंदोलन सुरूच ठेवले. त्यानंतर रात्री दहा नंतर दत्त इंडिया प्रशासनाने दर देण्याबाबतचे पत्र जिल्हाधिकारी यांना देण्यात आले. यानंतर जिल्हाधिकाऱ्यांकडून स्वाभिमानी शेतकरी संघटनेला दत्त इंडियाकडून मिळालेल्या पत्राच्या अनुसरून स्वाभिमानीच्या मागणी पेक्षा अधिक दर देण्याचे मान्य करत असल्याचे लेखी पत्र स्वाभिमानी शेतकरी संघटनेला देण्यात आले. त्यानंतर राजू शेट्टींनी वसंतदादा कारखान्यासमोर सुरू असलेला काटा बंद आंदोलन मागे घेत असल्याचे जाहीर केले.
शनिवारी होणार बैठक
मात्र असे असले तरी सांगली जिल्ह्यातील इतर साखर कारखान्यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केलेली मागणी मान्य केली नसून, त्यांनी आपली भूमिका जाहीर केलेली नाही. त्यामुळे आता शनिवारी (ता.16) पुन्हा जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली ऊस दराबाबत बैठक होणार आहे. तोपर्यंत या 14 कारखान्यांविरोधात स्वाभिमानी संघटनेने आंदोलन सुरूच ठेवले आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील ऊस दराचा तिढा सुटला आहे. मात्र, अद्याप सांगली जिल्ह्यातील दराचा प्रश्न कायम आहे. त्यामुळे कोल्हापूर प्रमाणेच सांगली जिल्ह्यातील कारखान्यांनी ऊसाला दर द्यावा, अशी भूमिका राजू शेट्टींनी घेतली आहे.