साखर आयुक्तांकडून ऊस तोडणीसह वाहतूक खर्च जाहीर, अधिक पैसे घेणाऱ्या कारखान्यांवर होणार कारवाई

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात ऊस गाळप हंगामाला सुरुवात झाली आहे. अशातच आता साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी एक महत्वाचा निर्णय जाहीर केला आहे. साखर कारखान्यांकडून ऊस तोडणी आणि वाहतुकीचा खर्च जाहीर केला आहे. कोणत्याही कारखान्याकडून ठरलेल्या रकमेपेक्षा अधिक रक्कम घेणाऱ्या कारखान्यावर करावी होणार आहे. त्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे.

याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, शेतकरी संघटनांनी आरोप केला आहे की, राज्यातील सहकारी आणि खासगी साखर कारखाने शेतकऱ्यांचा ऊस ऊसतोड कामगार पाठवून गाळपासाठी घेऊन जतात. त्यासाठी येणारा खर्च शेतकऱ्यांच्या ऊसाच्या बिलातून वजा केला जातो. मात्र, साखर कारखाने तोडणी आणि वाहतुकीसाठी येणारा खर्च वाढवून दाखवतात. या पार्श्‍वभूमीवर साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी राज्यातील 200 साखर कारखान्यांचे प्रती मेट्रिक टन ऊसाचे तोडणी आणि वाहतुकीचे दरपत्रक जाहीर केलं आहे. या दरपत्रकात नमुद करण्यात आलेली रक्कमच कारखाने शेतकऱ्यांच्या बीलातून वजा करु शकणार आहेत. त्याचबरोबर ज्या शेतकऱ्यांना स्वतः चा ऊस तोडून साखर कारखान्यापर्यंत पोहोचवायचा असेल तर त्यांना तशी मुभा देण्यात आली आहे

कोणत्या कारखान्याचा दर अधिक ?

राज्यातील 200 साखर कारखान्यांचे ऊसाचे तोडणी आणि वाहतुकीचे दरपत्रक जाहीर केले आहे. यामध्ये सर्वाधिक ऊस तोडणी आणि वाहतूक खर्चाचा दर (प्रति मेट्रिक टन) नाशिक जिल्ह्यातील धाराशिव शुगर कारखान्याचा आहे. त्या खारखान्याचा 1 हजार 109 रुपये खर्च आहे. त्याखालोखाल औरंगाबादच्या सिल्लोडमधील खडकपूर्णा अॅग्रो कारखान्याचा दर 1 हजार 102 रुपये आहे. तर, सर्वांत कमी दर सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील क्रांतिवीर डॉ. नागनाथ नाईकवडी हुतात्मा किसन अहीर कारखान्याचा दर आहे. तो दर 571 रुपये तर कोल्हापूर जिल्ह्यातील भोगावती साखर कारखान्याचा दर 595 रुपये इतका आहे. साखर कारखान्यांचा तोडणी आणि वाहतूक खर्च जास्त असतो, असा आरोप शेतकरी संघटनांकडून केला जात आहे. या पार्श्वभूमीवर येत्या हंगामात कारखान्यांचा खर्च वाजवी असल्याची खात्री करुन, गाळपासाठी ऊस देताना शेतकऱ्यांनी जवळच्या कारखान्याची निवड करावी. हा खर्च जास्त वाटल्यास शेतकऱ्यांना कारखान्याच्या कार्यक्रमानुसार परंतू स्वतः मालकतोड करुन ऊस गाळपासाठी नेता येणार आहे.

error: Content is protected !!