हॅलो कृषी ऑनलाईन: गेल्या काही वर्षात टोमॅटो पिकावर टुटा नागअळीचा (Tomato Tuta Absoluta Pest) प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात आढळून येत आहे. या किडीचा प्रसार दक्षिण अमेरिकेतून युरोप, आफ्रिका आणि आता भारतात मोठ्या प्रमाणात होत आहे. मागील काही वर्षात महाराष्ट्रातील प्रमुख टोमॅटो उत्पादक जिल्हे उदा., पुणे, अहमदनगर, धुळे, जळगाव, नाशिक आणि सातारा येथील शेतकर्यांच्या शेतात या किडीचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव दिसून आलेला आहे.या किडीमुळे (Tomato Tuta Absoluta Pest) होणारे नुकसान आणि एकात्मिक नियंत्रण उपाय जाणून घेऊ या.
प्रादुर्भाव आणि प्रसाराची कारणे (Causes of Tomato Tuta Absoluta Pest)
बदलते हवामान आणि संकरित टोमॅटोची वर्षभर लागवड यामुळे जास्त काळ पीक शेतात राहणे, पिकांची फेरपालट न करता एकाच शेतातून वर्षातून 3 ते 4 वेळा सलग टोमॅटोची लागवड ही बाब टुटा अळीच्या प्रादुर्भावासाठी अनुकूल ठरते. किडीचा प्रादुर्भाव सुरुवातीला नागअळी प्रमाणे दिसत असल्यामुळे त्याच्याकडे दुर्लक्ष केले जाते. मात्र नागअळीसाठी नियंत्रणासाठी वापरली जाणारी कीडनाशके यावर काम करत नाहीत. तसेच सुरुवातीला करपा सदृश लक्षणे दिसल्यामुळे बुरशीनाशकांची फवारणी केली जाते. त्यामुळे सुरुवातीच्या अवस्थेत आणि वाढीच्या कालावधीत ही कीड दुर्लक्षित राहते व या किडीचा प्रादुर्भाव वाढतो.
अंडी आणि अळी अवस्थेचा रोपवाटिकेतील रोपांमार्फत टुटा नागअळीचा (Tomato Tuta Absoluta Pest) प्रसार होतो. उघड्यावरील रोपवाटिका किंवा इन्सेक्ट नेट शिवाय रोप तयार केले असल्यास रोपांवर मादी पतंग अंडी घालते. त्याद्वारे प्रसार जास्त संभवतो. प्रादुर्भावग्रस्त टोमॅटोची योग्य विल्हेवाट न लावल्यास सुद्धा किडीचा धोका वाढतो.
टुटा नाग अळीमुळे पिकाचे होणारे नुकसान (Crop damage by Tuta Absoluta)
ही अळी अंड्यातून बाहेर पडताच लगेच कोवळी पाने खायला लागते. पानांच्या आतमध्ये शिरून पानांच्या पापुद्र्यामध्ये हरितद्रव्ये खाते, त्यामुळे पानांवर पांढरट तपकिरी, अनियमित चट्टे तयार होतात. काही प्रमाणात शेंड्याकडील पाने गोळा होतात. ही अळी कोवळ्या फांद्या आणि फळांमध्ये लहान छिद्रे करून प्रवेश करते. पिकलेल्या फळांध्ये हे छिद्र पिवळ्या रिंगने लवकर लक्षात येते. फळांच्या देठाजवळ विष्ठा करते त्यामुळे पिकलेल्या फळांतून रस बाहेर येऊन नंतर फळ सडते.
ही कीड टोमॅटोवरील (Tomato Tuta Absoluta Pest) पाने, देठ, कळ्या, कोवळी फळे किंवा पिकलेली फळे यावर आक्रमण करते. टोमॅटोच्या कुळातील वांगी व बटाटा या पिकांवर देखील उपजीविका करते. या किडीमुळे बहुतेक ठिकाणी 50 टक्के पेक्षा जास्त टोमॅटो पिकाचे नुकसान झाले असून 90 टक्के फळांची गुणवत्ता खालवल्याचं निदर्शनास आले आहे.
एकात्मिक कीड नियंत्रण उपाय (Integrated Pest Management)
या किडीच्या नियंत्रणासाठी गावपातळीवर सामूहिकरीत्या एकात्मिक नियंत्रण पद्धतीचा अवलंब जास्त प्रभावशाली ठरू शकतो. कारण ही कीड एका शेतातून दुसर्या शेतात आक्रमण करते.
प्रतिबंधात्मक उपाय (Preventive Measures)
- पीक काढणीनंतर जमिनीची खोल नांगरट करावी. त्यामुळे किडीच्या सुप्तावस्था नष्ट होण्यास मदत होते. प्रादुर्भावग्रस्त पाने, फळे शेताबाहेर नेऊन नष्ट करावेत.
- संपूर्ण नर्सरीमध्ये एकाच वेळी बियाणे लागवड करावी. जेणेकरून कीड नियंत्रण करणे सोपे होईल. रोपांच्या अवस्थेनुसार नर्सरीचे विभाग करून व्यवस्थापन करावे.
- खुल्या जागेत टोमॅटो रोपवाटिका तयार करणे टाळावे, त्याऐवजी संरक्षित नेटमध्ये रोपांची वाढ करावी. 6 फूट उंचीपर्यंत इन्सेक्ट नेटचा वापर करावा.
- वनस्पतिजन्य कीटकनाशकांची प्रतिबंधात्मक फवारणी घ्यावी. जेणेकरून सुरुवातीलाच किडीवर नियंत्रण मिळविता येईल.
- रोपवाटिकेमध्ये नियमितपणे कामगंध, प्रकाश व चिकट सापळ्यांचा वापर करावा. त्यामुळे प्रौढ पतंगांचे नियंत्रण होऊन रोपांमार्फत होणारा प्रसार टाळला जाईल.
- प्रादुर्भावग्रस्त भागातून मजुरांची ये-जा किंवा क्रेटची ने-आण करू नये.
सापळ्यांचा वापर (Uses Of Different Traps)
एकरी 10 ते 15 कामगंध सापळे लावावेत, टुटा अळीचे (Tomato Tuta Absoluta Pest) ल्यूर दर 30 ते 45 दिवसांनी बदलावे.
शेतात 1 ते 2 प्रकाश सापळे प्रति एकरी रात्रीच्या वेळी लावावेत.
कामगंध तसेच प्रकाश सापळे लावताना त्यांच्या आजूबाजूला पिवळे चिकट सापळे लावावेत. जेणेकरून प्रौढ पतंगावर प्रभावी नियंत्रण मिळविता येईल.
प्रौढ कीड नियंत्रणासाठी त्रिकोणी आकाराच्या डेल्टा ट्रॅप सोबत चिकट सापळे सुद्धा लावावेत.
जैविक नियंत्रण उपाय
ट्रायकोग्रामा बॅक्ट्री या परोपजीवी मित्र कीटकांचा वापर करून किडीची अंडी अवस्था नष्ट करता येते.
बॅसिलस थुरिंन्जेंसिस किंवा मेटाऱ्हाझियम अॅनिसोप्ली किंवा बिव्हेरिया बॅसीआना या जैविक कीटकनाशकांचा आलटून पालटून वापर करावा.
किडीच्या अंडी घालण्याच्या क्रियेमध्ये अडथळा आणण्यासाठी सुरुवातीच्या अवस्थेत करंज व नीम आधारित जैविक उत्पादनांचा वापर करावा.
रासायनिक नियंत्रण उपाय (Chemical Control Measures)
किडीने आर्थिक नुकसान पातळी ओलांडल्यानंतर रासायनिक नियंत्रणाचा अवलंब करावा. यासाठी क्लोरअन्ट्रानिलीप्रोल (18.5 एस. सी.) 3 मिलि किंवा स्पिनोसॅड (45 एससी 12) 2.5 मिलि किंवा इंडोक्झाकार्ब (14.5 एस. सी.) 10 मिलि किंवा फ्लुबेन्डामाईड (48 एस. सी.) 2.5 मिलि प्रति 10 लिटर पाणी यापैकी एका कीटकनाशकाची आलटून पालटून फवारणी करावी.