Tur Bajar Bhav : तूर दरात मोठी वाढ; मिळतोय 12 हजार रुपये क्विंटलचा भाव!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात सध्या तुरीच्या दरवाढीने (Tur Bajar Bhav) चांगलाच जोर धरला असून, तुरीचे दर 12 हजार रुपये प्रति क्विंटलपर्यंत पोहचले आहेत. मागील 10 ते 12 दिवसांमध्ये तुरीने हा दरवाढीचा टप्पा गाठला आहे. सामान्यपणे मार्च महिन्याच्या अखेरीस कमाल 10400 रुपये प्रति क्विंटलपर्यंत असलेले तूर दर सध्या कमाल 12000 रुपये प्रति क्विंटलपर्यंत पोहचले आहे. वाशीम जिल्ह्यातील कारंजा बाजार समितीत तुरीला सध्या कमाल 12005 ते किमान 9895 रुपये तर सरासरी 11300 रुपये प्रति क्विंटलचा दर (Tur Bajar Bhav) मिळत आहे.

तुरीला सर्वाधिक दर कुठे (Tur Bajar Bhav 7 April 2024 In Maharashtra)

शनिवारी (ता.6) वर्धा जिल्ह्यातील सिंदी बाजार समितीत (Tur Bajar Bhav) कमाल 11800 ते किमान 9550 रुपये तर सरासरी 10000 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला आहे. लातूर जिल्ह्यातील उदगीर बाजार समितीत कमाल 11800 ते किमान 10500 रुपये तर सरासरी 11150 रुपये प्रति क्विंटल, अकोला जिल्ह्यातील तेल्हारा बाजार समितीत कमाल 11750 ते किमान 10500 रुपये तर सरासरी 11300 रुपये प्रति क्विंटल, अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर बाजार समितीत कमाल 11605 ते किमान 9500 रुपये तर सरासरी 11200 रुपये प्रति क्विंटल, लातूर जिल्ह्यातील औराद शहाजानी बाजार समितीत कमाल 11400 ते किमान 10700 रुपये तर सरासरी 11050 रुपये प्रति क्विंटल, वर्धा जिल्ह्यातील आर्वी बाजार समितीत कमाल 11340 ते किमान 9000 रुपये तर सरासरी 10000 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला आहे.

‘या’ मार्केटमध्ये 11 हजाराहून अधिक दर

याशिवाय सध्या मुरुम (धाराशिव), अकोला, अमरावती, चिखली (अमरावती), नागपूर, पाचोरा (जळगाव), सावनेर (नागपूर), तेल्हारा (अकोला), उमरगा (धाराशिव), नेर परसोपंत (यवतमाळ), दुधणी (सोलापूर), उमरेड (नागपूर) या राज्यातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये तुरीला 11 हजार रुपये प्रति क्विंटलहुन अधिक दर मिळत आहे. तर काही निवडक चार ते पाच बाजार समित्या वगळता उर्वरित सर्व बाजार समित्यांमध्ये तुरीला कमाल 10 हजार ते 11 हजार रुपये प्रति क्विंटल दर मिळत आहे.

यंदाचा हंगाम दिलासादायक

सोयाबीन आणि कांदा उत्पादक शेतकरी योग्य दर मिळत नसल्याने, यंदा जेरीस आले आहे. मात्र, तूर दराने (Tur Bajar Bhav) यावर्षी काढणी हंगामाच्या सुरुवातीपासूनच शेतकऱ्यांना मोठा धीर दिला आहे. यावर्षी जानेवारी 2024 या महिन्याच्या मध्यावधीपर्यंत तुरीचे दर कमाल 8000 ते 9000 रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान पाहायला मिळत होते. मात्र, त्यानंतर तूर दरात झालेली वाढ अजूनही कायम असून, मध्यंतरी दोन महिने तुरीचे दर कमाल 10500 रुपये प्रति क्विंटलपर्यंत स्थिरावले होते. मात्र, आता आवक कमी झाल्याने, तूर दराने पुन्हा उसळी घेतली आहे. सध्या राज्यात अनेक बाजार समित्यांमध्ये तुरीला 11 हजार रुपयांच्या पुढे भाव मिळत असून, कारंजा बाजार समितीत तुरीने 12 हजार रुपये प्रति क्विंटलचा पल्ला गाठला आहे.

दरवाढीमागील कारण काय?

सध्याच्या घडीला राज्यातील सर्वच बाजार समित्यांमध्ये तुरीची आवक घटली आहे. विशेष म्हणजे उन्हाळयाच्या दिवसांमध्ये बऱ्याच गृहिणी या वर्षभराची तुरीच्या डाळींसह अन्य डाळींची तजवीज करून ठेवतात. यामुळे या कालावधीत त्या-त्या डाळवर्गीय पिकांना मागणी असते. अशातच सध्या हंगामही शेवटाला आला असून, शेतकऱ्यांकडील गुणवत्तापूर्ण तुरीची आवक कमी झाली आहे. परिणामी, सध्या तूर दरवाढीला बळ मिळाले आहे.

error: Content is protected !!