हॅलो कृषी ऑनलाईन: तुरीच्या दराने (Tur Bajar Bhav) 10 हजारांचा टप्पा ओलाडल्यांने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. विदर्भातील अकोला कृषी बाजार समितीत तुरीच्या दराच्या वाढीचा ट्रेंड कायम आहे.
सद्यस्थितीत राज्यातील अनेक बाजार समितीमध्ये तुरीचे दर (Tur Bajar Bhav) दहा हजार रूपयांवर पार झालेले आहे. विदर्भातील अकोला कृषी बाजार समितीत तुरीच्या दराच्या वाढीचा ट्रेंड कायम आहे. या बाजारात 10,400 रूपये प्रति क्विंटलप्रमाणे तूरीला भाव मिळतो आहे. येत्या काही दिवसांत तूरीचे दर आणखी वाढतील, अशी शक्यता बाजार समितीतील कृषी अभ्यासकांनी वर्तविली. या हंगामात देशातील तुरीचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घटले असल्यामुळे, सर्वच बाजारात तुरीला चांगली मागणी आहे. यामुळे तूर उत्पादक शेतकरी आनंदात आहेत.
कापूस आणि सोयाबीनला अपेक्षानुसार भाव नसल्याने शेतकर्यांना तूरीकडून अपेक्षा उरल्या होत्या. तुरीला या हंगामातील सर्वांधिक उच्चांकी भाव मिळाल्यानं कापूस आणि सोयाबीनच्या दरापासून निराशा असलेल्या शेतकऱ्यांसाठी ही दिलासा देणारी बातमी आहे.
तुरीच्या दराच्या वाढीचा ट्रेंड सुरू (Tur Bajar Bhav Trend)
अकोला कृषी बाजार समितीत मागील वर्षातील 1 डिंसेबर 2023 रोजी तुरीला किमान भाव 8 हजार पासून कमाल भाव 10 हजार इतका होता. त्यानंतर सातत्याने तुरीच्या दरात घसरण पाहायला मिळाली होती. या नववर्षात तुरीच्या दरात सुधारणा होत असून दरवाढीचा ट्रेंड सुरू आहे, अकोल्याच्या बाजारात 2 जानेवारीला तूरीला किमान भाव 7 हजार पासून 8,680 रूपये असा मिळाला होता. त्यानंतर तुरीच्या दरात तेजी कायम असून 6 जानेवारी रोजी 6,800 ते 9,320 रूपये, तेच 12 जानेवारीचा तुरीचा भाव 7,500 ते 9,380 रूपये, 17 जानेवारीला कमीत कमी 6,860 पासून 9,560 रूपये क्विंटलमागे भाव होता. 20 जानेवारी रोजी तुरीनं दहा हजार रूपयांचा टप्पा गाठला असून या दिवशी 7,400 ते 10,285 रूपये असा दर मिळाला. मंगळवारी तुरीला (23 जानेवारी) 7 हजार ते कमाल भाव 10, 345 रूपये होता. या दरात काल बुधवारी 55 रुपयांनी क्विंटलमागे वाढ असून सद्यस्थितीत तूरीला 10,400 रूपये असा प्रतिक्विंटल भाव आहे. तर सरासरी भाव 8,800 रूपयांवर असून आज 1,383 एवढी क्विंटल तुरीची आवक झाली आहे. दरम्यान गेल्या सात दिवसांत 9,342 क्विंटल एवढी तुरीची आवक झालीय.
दरम्यान तुरीच्या बाजार भावातील हीच तेजी कायम राहिल्यास आगामी दिवसात हे भाव सहजपणे ११ हजारांचा टप्पा गाठू शकणार. फ्रेब्रुवारी महिन्याच्या अखेरीस तुरीचा भाव (Tur Bajar Bhav) १२ हजार रूपयांवर गाठू शकेल, असा अंदाज बाजार समितीच्या कृषी अभ्यासकांनी व्यक्त केलाय.
तुरीचे उत्पादन घटण्याची कारणे (Reasons for Tur production decrease)
सध्या तूर सोंगणी व काढणीला सुरुवात झाली आहे. यंदाच्या खरीप हंगामात पेरण्या उशिरा झाल्याने हंगाम लांबला होता. दुसरीकडे अपुऱ्या पावसामुळे खरीप पिकांच्या उत्पादनात प्रचंड घट, तसेच तुरीचे पीक ऐन फुलधारणेच्या अवस्थेत असताना अवकाळी पावसाचा तडाखा. त्यानंतर ढगाळ वातावरण, अन् अळींच्या प्रकोपामुळे तुरीचे प्रचंड नुकसान झाले. त्यामुळे जिल्ह्यात तूर उत्पादनात प्रचंड घट झाली, आज शेतकऱ्यांना एकरी एक ते दोन क्विंटलच उत्पादन झाल्याचं दिसून आले आहे. त्यामुळे आगामी काळातही तूर दरवाढ (Tur Bajar Bhav) दिसून येणार आहे.