हॅलो कृषी ऑनलाईन : देशातील महागाई रोखण्यासाठी केंद्र सरकारने विनाशुल्क तूर आणि उडीद आयातीस (Tur Import) 31 मार्च 2025 पर्यंत मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे आता बाहेरील देशांमधून कोणत्याही शुल्काविना मोठ्या प्रमाणात पिवळा वाटाणा, मसूरसह तूर आणि उडीद देशात येऊ शकणार आहे. केंद्र सरकारच्या वाणिज्य मंत्रालयाच्या विदेश व्यापार महासंचानयाकडून याबाबत एक परिपत्रक जारी करण्यात आले असून, त्यात विना शुल्क तूर आणि उडीद आयातीस (Tur Import) 31 मार्च 2025 पर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे. असे म्हटले आहे.
दरम्यान, गेल्याच आठवड्यात केंद्र सरकारने पिवळा वाटाणा आणि मसूरची देखील विना शुल्क आयात (Tur Import) करण्यास 31 मार्च 2025 पर्यंत मुदत वाढवली आहे. त्यामुळे डाळींचा अपुरा पुरवठा ही सरकारसाठी डोकेदुखी ठरली आहे. मात्र, सरकारच्या महागाई रोखण्याच्या धोरणामुळे शेतकऱ्यांचे मात्र मरण होत असल्याचे पाहायला मिळत आहे. याआधीच केंद्र सरकारने कांदा निर्यात बंदीचा निर्णय घेऊन, कांद्याचे दर पाडले. त्यांनतर अनेक देशांकडे डाळींच्या आयातीसाठी विचारणा केल्यानंतर विनाशुल्क डाळींच्या आयातीला मुदत वाढ दिली आहे. त्यामुळे आता तूर आणि उडीद दरात काहीशी घसरण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
तीन वर्षातील निच्चांकी उत्पादन (Tur Import Extension of Duty Free Import)
देशातंर्गत तुरीच्या उत्पादनात घट झाल्याने, मागील काही दिवसांपासून तूर उत्पादक शेतकऱ्यांना चांगला दर मिळत होता. यावर्षीच्या हंगामातील तुर आणि उडीदाचे उत्पादन हे मागील तीन वर्षातील निच्चांकी उत्पादन असल्याचे केंद्र सरकारने म्हटले आहे. 2023 या वर्षातील खरीप हंगामात तूर उत्पादन हे 3.22 मिलियन टन इतके होण्याची शक्यता आहे. जे मागील वर्षीच्या तुलनेत 2.7 टक्कयांनी कमी आहे. तर उडीदाचे उत्पादन यावर्षी 1.6 मिलियन टन होण्याची शक्यता आहे. जे मागील वर्षी 1.77 मिलियन टन इतके नोंदवले गेले होते.
दरावर तितकासा परिणाम नाही
केंद्र सरकारने डाळींचे दर नियंत्रणात ठेऊन ग्राहकांना दिलासा देण्यासाठी हा निर्णय घेतल्याचे म्हटले आहे. केंद्र सरकारने 2022-23 च्या हंगामात जवळपास 9 लाख 50 हजार टनांच्या आसपास तूर आयात केली. यावर्षी देशात तुरीची टंचाई असल्याने, सरकार आयातीला प्रोत्साहन देत आहे. मात्र आता सरकारने तूर आयातीसाठी ही मुदतवाढ दिली तरी अपेक्षेपेक्षा जास्त तूर आयात होण्याची शक्यता कमीच आहे. त्यामुळे सरकारच्या या धोरणाचा तुरीच्या भावावर जास्त काही परिणाम जाणवणार नाही, असे जाणकारांकडून सांगितले जात आहे.