Tur Kharedi : 6 लाख टन तूर, मसूर खरेदीचे केंद्राचे लक्ष्य; आतापर्यंत केवळ 8000 टनांची खरेदी!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : केंद्र सरकारने देशातील शेतकऱ्यांकडून तूर खरेदी (Tur Kharedi) करण्यासाठी ई-समृद्धि पोर्टल सुरु केले आहे. या पोर्टलवर नोंदणीकृत असलेल्या शेतकऱ्यांकडून केंद्र सरकारकडून आता 6 लाख टन तूर आणि मसूर खरेदी करण्याचे लक्ष्य निर्धारित केले आहे. नॅशनल ऍग्रीकल्चरल को-ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (नाफेड) आणि भारतीय राष्ट्रीय उपभोक्ता सहकारी संघ मर्यादित अर्थात एनसीसीएफकडून ही तूर आणि मसूर खरेदी (Tur Kharedi) केली जाणार आहे. तूर आणि मसूरचा राखीव साठा करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

केवळ 8 हजार टन तुरीची खरेदी (Tur Kharedi 6 Lakh Tonnes)

केंद्रीय सहकार मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, देशभरात थेट शेतकऱ्यांकडून जानेवारी महिन्यापासून तूर खरेदी सुरु केली आहे. मात्र, आतापर्यंत नाफेड आणि एनसीसीएफकडून केवळ 8 हजार टन इतकीच तूर खरेदी करण्यात आली आहे. साधारपणपणे मार्च महिन्यात सुरु होणारी सरकारी तूर खरेदी यंदा जानेवारी महिन्यातच सुरु करण्यात आली. मात्र अपेक्षेपेक्षा कमी तूर खरेदी झाल्याचे सहकार मंत्रालयाने आपल्या आकडेवारीत म्हटले आहे. अशातच आता केंद्र सरकारकडून मार्च महिन्यात शेतकऱ्यांकडून मसूर खरेदी करण्यासह, एकत्रितपणे 6 लाख टन तूर आणि मसूर खरेदी करण्याचे लक्ष्य निर्धारित केले आहे.

सहकार मंत्रालयाच्या माहितीनुसार, शेतकऱ्यांना सरकारच्या थेट खरेदीचा फायदा मिळावा. यासाठी तूर आणि मसूर खरेदी केली जाणार आहे. याशिवाय आवश्यकतेनुसार राखीव साठा पूर्ण व्हावा. यासाठी सरकारकडून तूर आणि मसुरची वेळोवेळी आयात करण्याचा निर्णय घेतला जाईल. सध्याच्या स्थितीत केंद्र सरकारने 4 लाख टन तूर खरेदी तर 2 लाख टन मसूर खरेदीचे लक्ष्य निर्धारित केले आहे.

दरम्यान, केंद्र सरकारकडून यावर्षीच्या 2023-24 च्या किमान आधारभूत किमतीने (हमीभाव) तूर खरेदी करण्याचे निश्चित केले आहे. त्यानुसार सरकारकडून यंदाच्या हंगामात शेतकऱ्यांना तुरीसाठी 7000 रुपये प्रति क्विंटलचा दर निश्चित केला आहे. जो मागील वर्षी केंद्र सरकारकडून निश्चित करण्यात आलेल्या हमीभावापेक्षा 400 रुपयांनी अधिक आहे. याशिवाय केंद्र सरकारने मसूर पिकासाठी यावर्षी 6,425 रुपये प्रति क्विंटल इतका हमीभाव निर्धारित केला आहे. जो मागील वर्षी 6000 रुपये प्रति क्विंटल इतका निश्चित करण्यात आला होता.

error: Content is protected !!