Turmeric Farming : हिंगोलीच्या हळद संशोधन केंद्रासाठी 14 कोटींचा निधी मंजूर; वाचा.. जीआर!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : महाराष्ट्रात हळद या पिकाचे (Turmeric Farming) मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. प्रामुख्याने हिंगोली जिल्हा हा हळद उत्पादनासाठी देशात विशेष प्रसिद्ध आहे. या ठिकाणी उत्पादित होणाऱ्या हळदीला देशातच नव्हे तर विदेशात देखील मोठी मागणी असते. या पार्श्वभूमीवर हळद उत्पादक शेतकऱ्यांना प्रोत्साहन मिळावे. तसेच हळद पिकावर संशोधन व शेतकऱ्यांना प्रशिक्षण देण्यासाठी हिंगोली जिल्ह्यात बाळासाहेब ठाकरे हळद संशोधन व प्रशिक्षण केंद्र उभारण्यात आले. या हळद संशोधन (Turmeric Farming) व प्रशिक्षण केंद्राला 2023-24 या आर्थिक वर्षासाठी एकूण 14 कोटी 7 लाख रुपयांचे अनुदान राज्य सरकारकडून मंजूर करण्यात आले आहे. याबाबतचा जीआर (शासन निर्णय) राज्य सरकारकडून जारी करण्यात आला आहे.

हिंगोली जिल्ह्यात निम्म्याहून अधिक उत्पादन (Turmeric Farming 14 Crore Sanctioned)

राज्यात हळद लागवडीखालील (Turmeric Farming) एकूण क्षेत्र हे सुमारे 84 हजार 66 हेक्टर इतके आहे. त्यापैकी एकट्या हिंगोलीत 49 हजार 764 हेक्टर क्षेत्रावर हळद लागवड केली आहे. हे क्षेत्र एकूण क्षेत्राच्या तुलनेत निम्म्याहून अधिक आहे. याशिवाय लगतच्या नांदेड, वाशिम जिल्ह्यात देखील मोठ्या प्रमाणात हळद लागवड होते. तर इकडे सांगली जिल्ह्यातही राजापूरी हळद विशेष प्रसिद्ध आहे. ही बाब लक्षात घेऊन 2022 मध्ये तत्कालीन महाविकास आघाडी सरकारच्या काळात हिंगोली जिल्ह्यातील वसमत या ठिकाणी हे बाळासाहेब ठाकरे हळद संशोधन व प्रशिक्षण केंद्र उभारण्यात आले आहे.

काय म्हटलंय जीआरमध्ये?

राज्य सरकारकडून हिंगोली जिल्ह्यातील या हळद संधोधन व प्रशिक्षण केंद्राच्या निधी मंजुरीसाठीचा जीआर 7 मार्च 2024 रोजी प्रसिद्ध करण्यात आला आहे. चालू आर्थिक वर्ष 2023-24 साठी हा निधी वितरित करण्यात आला असून, वितरित केलेला निधी तातडीने खर्च करावा. तो पडून राहणार नाही. याची प्रशासनाने दक्षता घ्यावी, असेही राज्य सरकारने जीआरमध्ये नमूद केले आहे. राज्य सरकारने हा निधी प्रामुख्याने हळद संशोधन केंद्राच्या सहाय्यक वतनेत्तर अनुदानासाठी 6 कोटी 74 लाख रुपये व भांडवली मत्तेच्या निर्मितीसाठी 7 कोटी 33 लाख असे एकूण 14 कोटी 7 लाख रुपये अनुदान म्हणून मंजूर केले आहे.

अधिक माहितीसाठी वाचा जीआर : (https://gr.maharashtra.gov.in/Site/Upload/Government%20Resolutions/Marathi/202403071527557201.pdf)

error: Content is protected !!