हॅलो कृषी ऑनलाईन : मसाल्याच्या पिकांच्या शेतीमध्ये हळद शेतीला (Turmeric Farming) विशेष महत्व आहे. देशभरात हळदीची शेती केली जात असून, तिचा उपयोग घराघरात होतो. परिणामी वर्षभर बाजारात हळदीला मागणी असते. जगातील एकूण हळद उत्पादनापैकी एकट्या भारतात 80 टक्के हळदीचे उत्पादन होते. हळद पिकाच्या लागवडीतून शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात नफा देखील मिळतो. देशातील सर्व राज्यांमध्ये हळदीची शेती केली जाते. मात्र आज आपण देशातील हळद उत्पादनातील (Turmeric Farming) आघाडीच्या राज्यांमध्ये महाराष्ट्राला कितवे स्थान आहे, हे जाणून घेणार आहोत.
सर्वाधिक उत्पादन घेणारी राज्ये (Turmeric Farming Highest Cultivation)
देशात सर्वाधिक हळद उत्पादन घेणाऱ्या प्रमुख चार राज्यांचा विचार करता, दक्षिणेकडील तामिळनाडू (28.09 टक्के) हे राज्य प्रथम क्रमांकावर आहे. तर दुसऱ्या क्रमांकावर महाराष्ट्र राज्य असून, राज्यात देशातील एकूण 22.34 टक्के हळद उत्पादन घेतले जाते. तर तिसऱ्या क्रमांकावर कर्नाटक हे राज्य आहे. कर्नाटकात देशातील एकूण हळद उत्पादनापैकी 11.14 टक्के उत्पादन घेतले जाते. तर 6.35 टक्के उत्पादनासह आंध्र प्रदेश हे राज्य चौथ्या क्रमांकावर आहे.
गुणधर्मांमुळे विशेष मागणी
हळदीमध्ये अनेक औषधी गुणधर्म आढळतात. परिणामी बाजारात हळदीला मागणीसह किंमतही अधिक मिळते. याशिवाय हळदीचा वापर सौंदर्य प्रसाधने बनवण्यासाठी होत असल्याने त्यास एक मोठी बाजारपेठ उपलब्ध आहे. तसेच डॉक्टर देखील न्यूमोनिया, खोकला, ताप, दमाच्या आजार असणाऱ्यांना हळदीचा काढा घेण्याची सूचना करतात. कँन्सरसारख्या आजारावर हळद ही गुणकारी मानली जाते. अनेक औषधांमध्येही हळदीचा उपयोग होतो.
महाराष्ट्रातील वातावरण हळद लागवडीस अतिशय अनुकूल असल्यामुळे हळदीच्या क्षेत्रात वाढ होण्यास राज्यात वाव आहे. त्यासाठी महत्त्वपूर्ण बाबींवर काम करणे गरजेचे आहे. यात प्रामुख्याने हळदीच्या दरात सतत होणारे चढ-उतार, उन्नत जातीच्या लागवडीखालील अपुरे क्षेत्र, सेंद्रिय खतांची कमतरता, मोठ्या प्रमाणात करावा लागणारा मशागत खर्च, नियंत्रित बाजारपेठेचा अभाव, यांत्रिक पद्धतीने काढणी करणे या बाबींचा विचार करून राज्यात जास्तीचे क्षेत्र हळद लागवडीखाली आणले जाऊ शकते.