हॅलो कृषी ऑनलाईन : गेल्या तीन महिन्यापासून सतत वातावरणात होत असलेल्या बदलामुळे राज्यातील हळद पिकावर (Turmeric Karpa Disease) विपरीत परिणाम झाला आहे. नोव्हेंबरच्या शेवटी झालेला अवकाळी पाऊस, त्यांनतर पुन्हा गेल्या पंधरा दिवसांत ढगाळ हवामानासह झालेला पाऊस यामुळे हिंगोली जिल्ह्यातील हळद पिकावर करपा पडला आहे. करपा रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने यावर्षी हळद उत्पादनात जवळपास 25 ते 50 टक्केपर्यंत घट होऊ शकते. असे कृषी विभागाकडून सांगितले जात आहे. त्यामुळे आगामी काळात हळदीच्या दरात तेजी (Turmeric Farming) पाहायला मिळण्याची शक्यता आहे.
शेतकऱ्यांना मोठा फटका (Turmeric Karpa Disease In Hingoli)
देशातील सर्वाधिक हळद उत्पादन करणारा जिल्हा म्हणून हिंगोली जिल्ह्याची ओळख आहे. मात्र सध्या जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये हळद पिकावर करपा रोगाचा प्रादुर्भाव (Turmeric Karpa Disease) दिसून येत आहे. काही शेतकऱ्यांचे हळद पीक अक्षरशः करपून गेले आहे. जिल्ह्यातील टेंभुर्णी आणि आसपास भागात तर शेतकरी या करपा रोगामुळे त्रस्त झाले आहेत. या भागातील शेतकऱ्यांचे पूर्ण शेतचे शेत बसल्याचे सांगितले जात आहे. परिणामी, करपा रोगाच्या प्रादुर्भावामुळे शेतकऱ्यांच्या एकरी उत्पादनात मोठी घट होणार आहे. त्यामुळे त्याचा राज्याच्या एकूण हळद उत्पादनावर देखील परिणाम होऊन, त्यात 25 ते 50 टक्क्यांपर्यंत घट होऊ शकते, असे सरकारी पातळीवरून सांगितले जात आहे. त्यामुळे हळद उत्पादक शेतकऱ्यांना याचा मोठा फटका बसणार आहे. आधीच दुष्काळी परिस्थिती त्यात, करपा रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने शेतकऱ्यांना मोठे नुकसान सोसावे लागत आहे.
दरम्यान, हळद उत्पादनासाठी हिंगोली जिल्ह्याने आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. मात्र जिल्ह्यातील हळद पिकावर सध्या करपा रोगाने धाव घेतल्याने जिल्ह्यातील हळद उत्पादनात यंदा मोठी घट होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. ज्या शेतकऱ्यांच्या हळद पिकावर करपा रोगाचा प्रादुर्भाव झाला असेल त्यांनी कृषी विभागाकडे माहिती द्यावी, असे आवाहन सरकारी पातळीवरून करण्यात आले आहे. नोव्हेंबर महिन्याच्या शेवटी अवकाळी पावसाने झोडपून काढले होते. तर नववर्षाच्या सुरुवातीला जवळपास राज्यात सर्वत्र ढगाळ हवामान होते. त्यामुळे राज्याच्या अन्य भागांमध्ये विशेषता रब्बी कांद्यावरही रोगांचा प्रादुर्भाव दिसून येत असल्याचे सांगितले जात आहे.