Turmeric Rate : देशातील हळद लागवडीत घट; दरात तेजीचे संकेत!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : आगामी काळात मसाल्याच्या पिकांच्या दरात तेजी राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. विशेषतः देशातील हळद (Turmeric Rate) पिकाच्या उत्पादनात यावर्षी 12 टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. यावर्षी देशातील एकूण सामान्य लागवड क्षेत्राच्या तुलनेत 25 ते 30 टक्क्यांनी हळद लागवड कमी झाली आहे. त्यामुळे आगामी काळात हळदीच्या दरात (Turmeric Rate) तेजी पाहायला मिळू शकते, असा अंदाज हळद व्यापार क्षेत्रातील जाणकार व्यक्त करत आहेत.

उत्पादन घटण्याची शक्यता (Turmeric Rate Decline In Cultivation)

इरोड हळद मर्चेंट्स असोसिएशनच्या म्हणण्यानुसार, यावर्षी महाराष्ट्रात हळद उत्पादनात 30 टक्क्यांनी घट नोंदवली जाऊ शकते. तर तामिळनाडूमध्ये हळद उत्पादन 20 टक्क्यांनी घटू शकते. तेलंगणा आणि आंध्रप्रदेशातही यावर्षी हळद पिकाच्या लागवड क्षेत्रात अनुक्रमे 20 आणि 25 टक्क्यांनी घट झाली आहे. त्यामुळे यावर्षी देशातंर्गत बाजारात 4 लाख 87 हजार 500 टन हळदीची आवक होऊ शकते. जी मागील वर्षीच्या हंगामात 7 लाख 35 हजार टन इतकी नोंदवली गेली होती. सप्टेंबर आणि ऑक्टोबरच्या मध्यावधीपर्यंत हळद दर उच्चांकी पातळीवर पोहचले होते. त्यात सध्या काहीशी घसरण झाली असली तरी उत्पादनातील घटीमुळे हळद दर पुन्हा उसळी घेऊ शकतात. असेही इरोड हळद मर्चेंट्स असोसिएशनने म्हटले आहे.

हळद बाजारातील जाणकारांच्या म्हणण्यानुसार, यावर्षी पर्जन्यमान कमी झाल्याने हळद लागवड घटली आहे. पावसाअभावी शेतकऱ्यांनी अन्य पिकांची वाट धरली आहे. त्यामुळे 2023-24 च्या हळद हंगामात उत्पादनात मोठी घट नोंदवली जाऊ शकते. मसाला महामंडळाच्या आकडेवारीनुसार, 2022-23 मध्ये देशातील हळद उत्पादन 1.16 मिलियन टन इतके होण्याची शक्यता होती. मात्र प्रत्यक्षात त्यातही 10 ते 12 टक्क्यांनी घट नोंदवली गेली आहे. परिणामी वायदे बाजारातही हळदीने 16 हजारांपर्यंत उसळी घेतली होती.

मागणीत घट

मात्र सध्या बाजारात आवक वाढल्याने आणि मागणी कमी असल्याने हळदीचे दर (Turmeric Rate) 10 ते 12 हजारांच्या आसपास स्थिरावले आहेत. नोव्हेंबर महिन्यात हळदीची मागणी घटल्याने दरात घसरण झाल्याचे जाणकारांकडून सांगितले जात आहे. आपल्या 50 वर्षांच्या हळद व्यापारातील इतकी कमी मागणी आजपर्यंत आपण अनुभवली नसल्याचे एका व्यापाऱ्याने दर घसरणीबाबत म्हटले आहे.

error: Content is protected !!