Ujani Dam : उजनीतील जिवंत पाणीसाठा संपला; पाणलोट क्षेत्रावर दुष्काळाचे सावट!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे धरण म्हणून ओळख असलेल्या उजनी धरणातील (Ujani Dam) जिवंत पाणीसाठा संपल्याचे समोर आले आहे. परिणामी आता चार महिने आधीच पाणीसाठा संपल्याने, उजनी पाणलोट क्षेत्रातील शेतकऱ्यांना दुष्काळाचा सामना करावा लागणार आहे. सोलापूर, पुणे, अहमनगरचा काही भाग आणि धाराशिव या जिल्ह्यांसाठी उजनी धरण हे जीवनदायिनी मानले जाते. मात्र सरकारच्या जलसाठ्याच्या आकडेवारीनुसार उजनी धरणातील (Ujani Dam) जिवंत पाणीसाठा संपुष्टात आला आहे.

यावर्षी पावसाचे प्रमाण घटल्याने, उजनी धरण (Ujani Dam) केवळ 60 टक्के इतकेच भरू शकले होते. धरणात यावर्षी 95 टीएमसी पाण्याची साठवण झाली होती. मात्र, या साठ्यापैकी 63 टीएमसी पाणीसाठा हा मृत आहे. तर उर्वरीत साठा हा उपयुक्त पाणीसाठा म्हणजेच जिवंत पाणीसाठा होता. मात्र तो आता संपला असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे आता धरण प्रशासनाला पाण्याचे योग्य नियोजन करावे लागणार आहे. दरम्यान, 15 फेब्रुवारीला धरणातून सध्या शेतीसाठी सोडले जात असलेले पाणी बंद होईल. त्यानंतर धरणातील संपूर्ण पाणी प्राधान्याने केवळ पिण्यासाठीच राखीव ठेवले जाणार आहे.

उजनी धरणाची आकडेवारी (Ujani Dam Water Exhausted)

  • यावर्षी उजनी धरण 12 ऑक्टोबरपर्यंत 60.66 टक्के भरलेले होते.
  • गेल्या वर्षी 6 मे 2023 रोजी उजनी धरण मृत साठ्यात गेले होते.
  • यावर्षी 4 महिने आधीच पाणीसाठा मृत साठ्यापर्यंत गेला आहे.
  • 10 वर्षांत पहिल्यांदाच उजनी धरणाचा जिवंत पाणीसाठा इतका लवकर संपला आहे.

शेतीसाठी 13 फेब्रुवारीपर्यंत पाणी

दरम्यान, सध्या उजनी धरणात 60.66 टीएमसी मृत पाणीसाठा शिल्लक आहे. ज्यातून उजनीच्या मुख्य कालव्यातून 2 हजार 400 क्युसेक, भीमा-सीना जोड कालव्यातून 290 क्युसेक, सीना-माढा उपसा सिंचन योजनेतून 297, तर दहिगाव योजनेतून 80 क्युसेक विसर्ग शेतीसाठी 13 फेब्रुवारीपर्यंत सोडण्यात येणार आहे. यातील सीना-माढा व दहीगाव योजना सोमवारी बंद होणार आहे. भीमा-सीना जोडकालव्यातून 100 क्युसेकपर्यंत विसर्ग चालू राहणार आहे; तर उजनी मुख्य कालवा साधारण 13 फेब्रुवारीपर्यंत सुरू राहणार आहे.

error: Content is protected !!