हॅलो कृषी ऑनलाईन : गेल्या तीन ते चार दिवसांपासून राज्यात अवकाळी पावसाने (Unseasonal Rain) धुमाकूळ घातला आहे. ज्यामुळे राज्यातील 11 जिल्ह्यांमध्ये उन्हाळी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी बीड जिल्ह्यातील धारूर तालुक्यातील नुकसानग्रस्त भागाचा दौरा केला. यावेळी त्यांनी चोरंबा, सोनीमोहा आणि अंबे वडगांव या गावांतील नुकसानीचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी आपण राज्यातील सर्व जिल्ह्यातील अधिकाऱ्यांना अवकाळी पावसामुळे (Unseasonal Rain) झालेल्या पिकांच्या नुकसानीबाबत पंचनामे करण्याचे आदेश दिले असून, राज्य सरकारला त्याबाबत अहवाल पाठवण्याचे निर्देश दिले असल्याचे म्हटले आहे.
अमरावती जिल्ह्यात सर्वाधिक नुकसान (Unseasonal Rain In Maharashtra)
राज्यात मागील चार दिवसात अवकाळी पावसामुळे (Unseasonal Rain) 11 जिल्ह्यातील उन्हाळी पिकांना मोठा फटका बसला आहे. यात एकट्या अमरावती जिल्ह्यात 40,000 हेक्टरहुन अधिक क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे. यात प्रामुख्याने संत्री, आंबा, केळी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. तर अकोला जिल्ह्यात 4 हजार हेक्टरवरील पिके खराब झाल्याचे सांगितले जात आहे. तर बीड जिल्ह्यात 5 तालुक्यातील एकूण 97 गावांमधील 1020 हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचे सांगितले जात आहे. याशिवाय अन्य जिल्ह्यांमध्ये देखील नुकसानीचा आकडा बराच मोठा असल्याचे कृषी विभागाकडून सांगितले जात आहे.
शेतकऱ्यांशी साधला संवाद
हीच बाब लक्षात घेऊन कृषिमंत्री मुंडे यांनी नुकसानग्रस्त भागाचा दौरा केला असून, कृषी विभागातील अधिकाऱ्यांना सर्व जिल्ह्यांमधील नुकसानीचे पंचनामे करण्याचे निर्देश दिले आहेत. अवकाळी पावसामुळे राज्यात फळ पिके, भाजीपाला पिकांसह, जनावरांचा चारा, गहू, ज्वारी या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे आपल्या दौऱ्यावेळी मुंडे यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधत, नुकसानीचा मोबदला मिळण्यासाठी एक रुपयात पीक विमा योजनेसाठी अर्ज करण्यासाठी शेतकऱ्यांना आवाहन केले आहे. तसेच ज्या शेतकऱ्यांनी फळपीक विमा भरला आहे. अशा शेतकऱ्यांनी नुकसानीचे रिपोर्ट संबंधित कंपन्यांकडे सादर करावेत, जेणेकरून दुहेरी मदत मिळण्यास मदत होईल, असेही त्यांनी म्हटले आहे.