Unseasonal Rain : 4 वर्षांनंतर शेतकऱ्यांना मिळणार नुकसान भरपाई; वाचा जीआर!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : जून 2019 मध्ये जळगाव जिल्ह्यातील 7 तालुक्यांमध्ये वादळी वाऱ्यासह झालेल्या गारपीटीमुळे (Unseasonal Rain) शेती पिकांचे मोठे नुकसान झाले होते. या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आता आर्थिक मदत दिली जाणार आहे. यासाठीच्या एकूण 3 कोटी 25 लाख 42 हजार इतका निधी राज्य सरकारकडून मंजूर करण्यात आला आहे. हा निधी संबंधित शेतकऱ्यांना लवकरच वितरित केला जाणार आहे. याबाबतचा शासन निर्णय (जीआर) 26 फेब्रुवारी 2024 रोजी राज्य सरकारकडून जारी करण्यात आला आहे. त्यामुळे आता जळगाव जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

2390 हेक्टरवरील पिकांचे नुकसान (Unseasonal Rain In Maharashtra)

जळगाव जिल्ह्यात जून 2019 मध्ये वादळी वाऱ्यासह झालेल्या गारपीटीमुळे (Unseasonal Rain) पिकांना मोठा फटका बसला होता. ज्यात जवळपास 3 हजार 856 बाधित शेतकऱ्यांच्या 2390.08 हेक्टरवरील शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. याबाबत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी 14 ऑक्टोबर 2022 रोजी नाशिकचे विभागीय आयुक्त यांच्याकडून राज्य सरकारला मदतीचा प्रस्ताव पाठवण्यात आला होता. या प्रस्तावाला राज्य सरकारच्या मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे. त्यानुसार बाधित शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी राज्य सरकारकडून शासन निर्णय जारी करण्यात आला आहे.

“सरकारी काम, बारा महिने थांब”

दरम्यान, जून 2019 मध्ये गारपिटीमुळे जिल्ह्यातील ७ तालुक्यांमध्ये प्रामुख्याने केळी, लिंबू, पपई, डाळिंब तसेच भाजीपाला पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. या पिकांची नुकसान भरपाई देण्याबाबत शेतकऱ्यांकडून वारंवार मागणी केली जात होती. मात्र, “सरकारी काम आणि बारा महिने थांब” या उक्तीप्रमाणे सरकार ढिम्म असल्याचे याबाबत मागील काही वर्षांमध्ये पाहायला मिळाले. मध्यंतरीच्या काळात सरकार बदलले, अधिकारी तेच, आमदार खासदार, नेतेही तेच मात्र तरीही आर्थिक नुकसान भरपाई मिळत नसल्याने जळगाव जिल्ह्यातील शेतकरी हवालदिल झाले होते. परंतु, आता उशिरा का होईना? आर्थिक मदत मिळणार असल्याने या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

अधिक माहितीसाठी वाचा संपूर्ण जीआर : (https://gr.maharashtra.gov.in/Site/Upload/Government%20Resolutions/Marathi/202402261630439519.pdf)

error: Content is protected !!