Unseasonal Rain : डिसेंबर 2023 ची नुकसान भरपाई आली, 25 कोटी निधी मंजूर; वाचा जीआर!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्य सरकारने राज्यातील शेतकऱ्यांना (Unseasonal Rain) मोठा दिलासा दिला आहे. अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना, नुकसान भरपाई देण्यासाठी राज्य सरकारने एकूण 24 कोटी 67 लाख 37 हजार रुपये इतका निधी वितरित करण्यास मान्यता दिली आहे. याबाबत राज्य सरकारकडून जीआर जारी करण्यात आला आहे. ज्यामुळे आता नुकसान भरपाई (Unseasonal Rain) मिळण्याच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळणार आहे.

रब्बी पिकांना मोठा फटका (Unseasonal Rain In Maharashtra)

राज्यातील अनेक भागांमध्ये डिसेंबर 2023 आणि नववर्षाच्या सुरुवातीला जानेवारी 2024 च्या पहिल्या पंधरवड्यात अवकाळी पाऊस (Unseasonal Rain) आणि गारपिटीचा फटका बसला होता. ज्यामुळे ऐन पेरणी झालेल्या शेतकऱ्यांच्या रब्बी पिकांचे मोठे नुकसान झाले होते. काही भागांमध्ये आधीच पावसाअभावी खरीप हंगाम हातचा गेलेला असताना, आता पाण्याचे सुयोग्य नियोजन करून घेतलेल्या रब्बी पिकांनाही फटका बसला होता. ज्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागले. याच पार्श्वभूमीवर नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी सरकारकडे नुकसान भरपाईची केली होती. त्यानुसार आता राज्य सरकारकडून हा 25 कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

तीन हेक्टरपर्यंत मिळणार मदत

राज्य सरकारकडून हा निधी वितरित करताना प्रशासनाला काही गोष्टींची पडताळणी करण्याचे निर्देश देण्यात आले आहे. यामध्ये अतिवृष्टी, पूर व चक्रीवादळ यांसारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतीपिकांचे नुकसान झाल्याच्या अटींची पूर्तता संबंधित शेतकऱ्यांकडून होत असल्याची खात्री करावी. असे सांगण्यात आले आहे. तर नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पिकांच्या नुकसानीकरिता 2 ऐवजी 3 हेक्टरपर्यंत मदत देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असल्याचेही जीआरमध्ये नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तीन हेक्टरपर्यंत मदत मिळणार आहे.

दरम्यान, डिसेंबर 2023 आणि जानेवारी 2024 मध्ये अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीसाठी नाशिकचे विभागीय आयुक्त आणि नागपूरचे विभागीय आयुक्त यांच्याकडून पिकांचे नुकसानीचे प्रस्ताव राज्य सरकारला प्राप्त झाले होते. 2 जाने ते 20 जानेवारी या कालावधीत प्राप्त झालेल्या या प्रस्तावांना मंजुरी देऊन, संबंधित निधी मागणी करणाऱ्या शेतकऱ्यांना हा निधी वितरित करण्यास मंजुरी देत असल्याचेही जीआरमध्ये नमूद करण्यात आले आहे.

अधिक माहितीसाठी वाचा जीआर : (https://gr.maharashtra.gov.in/Site/Upload/Government%20Resolutions/Marathi/202403041503389719.pdf)

error: Content is protected !!