Unseasonal Rain : पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूरला पावसाने झोडपले; झाडे कोसळली, रस्ते बंद!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : गेला आठवडाभर विदर्भ-मराठवाड्यातील जिल्ह्यांना अवकाळी पावसाचा (Unseasonal Rain) मोठा फटका बसला. त्यातच आता अवकाळी पावसाने आपला मोर्चा दक्षिण-पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यांकडे वळवला आहे. मागील दोन दिवसांपासून पुणे जिल्ह्याला जोरदार पावसाने झोडपले आहे. तर बुधवारी (ता.१७) पुण्यासह सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडासह जोरदार पाऊस झाला आहे. या अवकाळी पावसामुळे अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली असून, काही ठिकाणी रस्ते बंद आहेत. तर अनेक ठिकाणी वीज पुरवठा खंडीत झाल्याने नागरिकांचे हाल झाले. याशिवाय या चारही जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसामुळे (Unseasonal Rain) शेतपिकांचे मोठे नुकसान झाले आहे.

जिल्ह्यानिहाय पाऊस परिस्थिती? (Unseasonal Rain In Maharashtra)

कोल्हापूर जिल्हा : जयसिंगपूर आणि हातकणंगले तालुक्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला आहे. या पावसामुळे जयसिंगपूर-सांगली महामार्गावर अनेक झाडे उन्मळून पडली. परिणामी जयसिंगपूर-सांगली महामार्गावरील वाहतूक तीन तास ठप्प होती. तर गडहिंग्लज तालुक्यात देखील अर्धा तास जोरदार पाऊस कोसळल्याचे सांगितले जात आहे.

सांगली जिल्हा : मिरज पूर्व भागात वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाने अनेक झाडे उन्मळून पडली. याशिवाय वादळी पावसामुळे लिंगनूर, शिंदेवाडी, मल्लेवाडी रस्त्यावरील झाडे उन्मळून पडली आहेत. याशिवाय जिल्ह्यात अनेक ठिकाणी घरांवरील पत्रे उडून गेली आहे. याशिवाय जिल्ह्यात उन्हाळी मका पिकाचे मोठे नुकसान झाल्याचे सांगितले जात आहे.

सातारा जिल्हा : सातारा जिल्ह्यात कराड तालुक्याच्या दक्षिण भागात वादळी वाऱ्यासह पाऊस झाला आहे. ज्यामुळे अनेक भागांमध्ये वीज पुरवठा खंडित झाला होता. अचानक आलेल्या या अवकाळी पावसामुळे नागरिकांची तारंबळ उडाली.

याशिवाय मराठवाड्यातील जालना जिल्ह्यात देखील बुधवारी (ता.17) संध्याकाळच्या सुमारास वादळी वारा आणि विजांच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस झाला आहे. या वादळी वाऱ्यामुळे अनेक झाडे उन्मळून पडली. तर या अवकाळी पावसाने रब्बी हंगामातील उशिरा पेरणी केलेल्या गहू,ज्वारी या पिकांसह मोसंबी, डाळिंब, द्राक्ष आणि आंबा या फळपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

error: Content is protected !!