Unseasonal Rain : ‘या’ राज्यात 50,000 एकरवरील पिकांचे नुकसान; एकरी 10,000 रुपये मिळणार!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : महाराष्ट्रातील पावसाचे वातावरण निवळले आहे. मात्र, शेजारील राज्य असलेल्या तेलंगणामध्ये अवकाळी पावसामुळे (Unseasonal Rain) पिकांचे नुकसान सुरूच आहे. तेलंगणाच्या कृषी विभागाच्या आकडेवारीनुसार, धान, मका, मिरची आणि आंबा बागांचे एकूण आतापर्यंत एकूण 50,000 एकरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. यामध्ये प्रामुख्याने वारंगल, कामारेड्डी, निजामाबाद, मेडक, संगारेड्डी, सिरसिला, करीमनगर आणि निर्मल जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसामुळे (Unseasonal Rain) पिकांचे सर्वाधिक नुकसान झाले आहे.

नुकसान भरपाईची मागणी (Unseasonal Rain In Telangana)

अशातच आता तेलंगणामधील शेतकऱ्यांकडून मका पिकासाठी एकरी 20,000 रुपये तर फळबाग पिकांसाठी 40,000 रुपये प्रति एकर नुकसान भरपाई देण्याची मागणी केली जात आहे. चिंतेची बाब म्हणजे तेलंगणातील शेतकऱ्यांना सध्या कोणत्याही विमा योजनेचा आधार नाही. मागील तीन वर्षांपासून तेलंगणातील भारत राष्ट्र समितीच्या (बीआरएस) सरकारने केंद्र सरकारची पीक विमा योजना राज्यात राबवण्यास नकार दिला आहे. मात्र, सध्या तेलंगणातील शेतकऱ्यांना नैसर्गिक आपतींचा सामना करावा लागत आहे. अशा परिस्थितीत आता राज्यातील काँग्रेस सरकारने पुढील वर्षीपासून पीक विमा योजनेत सहभागी होण्याचे ठरवले आहे.

एकरी 10,000 रुपये मिळणार

गेल्या चार ते पाच दिवसांपासून तेलंगणात पावसामुळे पिकांचे नुकसान सुरूच आहे. या पार्श्वभूमीवर तेलंगणा सरकारचे उत्पादन शुल्क आणि पर्यटन विभागाचे मंत्री जुपल्ली कृष्ण राव यांनी नुकसानग्रस्त जिल्ह्यांचा दौरा केला आहे. या पीक नुकसानीचा आढावा घेताना, त्यांनी तेलंगणा सरकारकडून शेतकऱ्यांना एकरी 10,000 रुपये नुकसान भरपाई देण्याचा निर्णय घेतला असल्याचे सांगितले आहे. यावेळी त्यांनी म्हटले आहे की, मुख्यमंत्री ए रेवंत रेड्डी यांच्यासोबत चर्चा करून, शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी आपण सर्वोतोपरी मदत करू, असा विश्वासही त्यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिला आहे.

पाण्याअभावी करपतायेत पिके

याउलट तेलंगणाच्या कृषी विभागातील एका अधिकाऱ्याच्या माहितीनुसार, राज्यात काही जिल्ह्यांमध्ये अवकाळी पाऊस सुरू असला तरी अनेक भागांमध्ये पिकांना पाणी कमी पडत आहे. तेलंगणातील नलगोंडा जिल्ह्यात 4,20,523 एकर, सूर्यापेट जिल्ह्यात 3,82,106 एकर आणि यदाद्री भुवनगिरी जिल्ह्यात 2,91,767 एकरावरील धान आणि अन्य पिकांना पाणी नसल्यामुळे पिके सुकली असल्याचे सांगितले जात आहे.

error: Content is protected !!