Unseasonal Rain : पुण्याला पावसाने झोडपले; राज्यात 80 हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : कालपासून (ता.16) पुणे आणि जिल्ह्याच्या ग्रामीण भागात जोरदार पावसाची हजेरी (Unseasonal Rain) पाहायला मिळत आहे. जिल्ह्यातील ग्रामीण भागांमध्ये पावसाचा जोर अधिक होता. परिणामी, या पावसामुळे शेतकऱ्यांच्या उन्हाळी बाजरी, मूग, भाजीपाला पिके, चारा पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच पुण्यातील पाषाण, सोमेश्वरवाडी, कोथरूड, औंध, बाणेर, वारजे, सिंहगड रस्ता परिसरात जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. अशातच गेले आठ दिवस राज्यात पावसाने थैमान घातले असून, मागील आठ दिवसांत (9 एप्रिलपासून) आतापर्यंत राज्यात एकूण 79,848 हेक्टरवरील पिकांचे नुकसान (Unseasonal Rain) झाले असल्याची प्राथमिक माहिती कृषी विभागाकडून समोर आली आहे.

जिल्ह्यानिहाय पीक नुकसानीची आकडेवारी (Unseasonal Rain In Maharashtra)

राज्यात गेल्या आठवडाभरात कोकण वगळता सर्व भागांमध्ये पावसाची हजेरी पाहायला मिळाली आहे. या अवकाळी पावसामुळे (Unseasonal Rain) अमरावती जिल्ह्यात सर्वाधिक ५३,४०२ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. त्यानंतर अकोला जिल्ह्यात ११ हजार १५७ हेक्टर, बुलढाणा जिल्ह्यात ६,५१३ हेक्टर, जळगाव जिल्ह्यात ३ हजार ९८४ हेक्टर, यवतमाळ जिल्ह्यात २,४९४ हेक्टर, बीड जिल्ह्यात १,०२१ हेक्टर, वाशिम जिल्ह्यात ३८८ हेक्टर, वर्धा जिल्ह्यात ३६८ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे.

भंडारा जिल्ह्यात १३ हेक्टर, गडचिरोली जिल्ह्यात ११ हेक्टर, जालना जिल्ह्यात १३४ हेक्टर, नागपूर जिल्ह्यात ९० हेक्टर, गोंदिया जिल्ह्यात ४५ हेक्टर, चंद्रपूर जिल्ह्यात ४ हेक्टर, नंदुरबार जिल्ह्यात १२२, धाराशिव जिल्ह्यात ३०८ हेक्टर, लातूर जिल्ह्यात ९५ हेक्टर तर संभाजीनगर जिल्ह्यात १६३ हेक्टरवरील पिकांचे नुकसान असे एकूण राज्यात जवळपास ७९,८४८ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचे कृषी विभागाच्या आकडेवारीत म्हटले आहे.

फळपिकांचे मोठे नुकसान

गेल्या आठवडाभरापासून भर उन्हाळ्यात सुरु असलेल्या या अवकाळी पावसामुळे उन्हाळी पिकांना मोठा फटका बसला आहे. यात प्रामुख्याने गहू, हरभरा, ज्वारी, मका, मूग, तीळ, बाजरी तसेच कांदा, भाजीपाला व पपई, संत्रा, लिंबू, मोसंबी, केळी, पपई, कलिंगड या फळपिकांचे मोठे नुकसान झाले आहे. तर काही भागांमध्ये वादळी वाऱ्यामुळे शेतकऱ्यांच्या घरावरील छप्परे उडून गेली आहेत. तर काही भागांत वीज पडून जनावरे आणि नागरिकांचा मृत्यू झाल्याच्या काही घटना देखील समोर आल्या आहेत.

error: Content is protected !!