Unseasonal Rain : शेतकऱ्यांच्या मदतीसाठी नेत्यांची धाव; तत्काळ पंचनामे करण्याचे निर्देश

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : अवकाळी पावसामुळे राज्यातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान (Unseasonal Rain) झाले असून, पुणे आणि नाशिक जिल्ह्याला याचा सर्वाधिक फटका बसला आहे. त्यामुळे राज्यातील नेत्यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर (Unseasonal Rain) धाव घेतली आहे. पुणे जिल्ह्यात सहकार मंत्री दिलीप वळसे-पाटील, नाशिक जिल्ह्यात सार्वजनिक बांधकाम मंत्री दादा भुसे यांनी पिकांच्या नुकसानीची पाहणी केली. यावेळी संबंधित नेत्यांनी महसूल यंत्रणेला तत्काळ नुकसानीचे पंचनामे करण्याचे निर्देश दिले आहेत.

पुणे जिल्ह्यातील आढावा

सहकारमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी पुणे जिल्ह्यातील आंबेगाव व शिरुर तालुक्यातील नुकसानीचा (Unseasonal Rain) आढावा घेतला. यावेळी त्यांनी आंबेगाव तालुक्यातील कुरवंडी (सातगाव पठार), जारकरवाडी, धामणी, लोणी, वडगावपीर, वाळूंजनगर, रानमळा, खडकवाडी, पोंदेवाडी आणि शिरुर तालुक्यातील वडनेर, सविंदणे, कवठे येमाई, मलठण, माळवाडी, म्हसे, निमगाव दुडे व टाकळी हाजी परिसरातील होणेवाडी, साबळेवाडी, शिनगरवाडी, ऊचाळेवस्ती, डोंगरगण तामखरवाडी या नुकसानग्रस्त गावांचा पाहणी दौरा केला.

दिलीप वळसे-पाटील यांनी यावेळी म्हटले आहे, “आंबेगाव व शिरुर तालुक्यात गारपिटीसह मुसळधार पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्त भागांचे पंचनामे करुन जिल्हा प्रशासनाकडे सादर करावे. शेतकऱ्यांना सामुग्रह अनुदान मिळवून देण्यासाठी मंत्रिमंडळात प्रस्ताव मांडण्यात येईल. शेतकऱ्यांना अधिकाधिक नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचेही वळसे पाटील यांनी यावेळी म्हटले आहे. यावेळी माजी आमदार पोपटराव गावडे, आंबेगावचे तहसीलदार संजय नागटिळक, शिरुरचे तहसीलदार बाळासाहेब म्हस्के, भीमाशंकर सहकारी कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब बेंडे, घोडगंगा सहकारी साखर कारखान्याचे संचालक सोपान भाकरे आदींसह शेतकरी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

नाशिक जिल्ह्यातील आढावा (Unseasonal Rain In Maharashtra)

नाशिक जिल्ह्यात रविवारी दुपारनंतर गारपीटीसह अवकाळी पाऊस झाला. यामुळे द्राक्ष पिकासह कांदा, ऊस, टोमॅटो, फळबागा, पालेभाज्या आदी पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. अवकाळी पावसामुळे झालेल्या या नुकसानीचे येत्या दोन दिवसांत पंचनामे पूर्ण करण्याचे निर्देश सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत. भुसे यांनी निफाड तालुक्यातील कसबे सुकेणे येथे द्राक्ष पिकांच्या नुकसानीची शेतात जाऊन पाहणी केली. यावेळी पीकविम्यासाठी विमा कंपनीकडे नोंदणी करण्याचाही सल्लाही त्यांनी शेतकऱ्यांना दिला आहे. या दौऱ्यावेळी आमदार दिलीप बनकर, माजी आमदार अनिल कदम, निफाडच्या उपविभागीय अधिकारी हेमांगी पाटील, तहसिलदार शरद घोरपडे याशिवाय कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांसह शेतकरी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

error: Content is protected !!