हॅलो कृषी ऑनलाईन : सध्याच्या घडीला अनेक शेतकरी जास्तीत जास्त उत्पादन (Varmi Compost Khat) मिळवण्यासाठी, भरपूर रासायनिक खताचा वापर करताना दिसत आहेत. तर एकीकडे काही शेतकरी सेंद्रिय शेतीकडे देखील वळताना दिसत आहेत. आरोग्याच्या दृष्टीने पाहिले तर भविष्यामध्ये सेंद्रिय शेतीला चांगले दिवस येणार आहेत. गांडूळ खत हा सेंद्रिय शेतीमधील एक महत्वाचा घटक आहे. याच पार्श्वभूमीवर आज आपण गांडूळ खत निर्मितीबद्दल (Varmi Compost Khat) माहिती घेणार आहोत.
शेतीपूरक जोडधंदा (Varmi Compost Khat For Farmers)
गांडूळ खत हे शेतकरी स्वतः तयार करू शकतात. त्यामुळे पिकाच्या उत्पादन खर्चात खूप बचत होते. तसेच शेतीचा पोत देखील सुधारतो. त्याचबरोबर गांडूळ खत निर्मितीकडे (Varmi Compost Khat) शेतीपूरक जोडधंदा म्हणून देखील पाहिले जाते. गांडूळ हा जमिनीत राहणारा प्राणी असून, तो जमिनीतील सेंद्रिय पदार्थ खातो. ते खाल्ल्यानंतर त्याच्या शरीराला आवश्यक असा भाग सोडून, उर्वरित भाग विष्ठा म्हणून शरीरातून बाहेर टाकतो, त्यालाच गांडूळ खत किंवा वर्मी कंपोस्ट खत असे म्हणतात. या संपूर्ण क्रियेला 24 तासांचा कालावधी लागतो.गांडूळ जेवढे पदार्थ खातो त्यापैकी स्वतःच्या शरीरासाठी फक्त दहा टक्के भाग ठेवतो व बाकीचा नव्वद टक्के भाग शरीरातून बाहेर टाकतो. जे वनस्पतीच्या वाढीसाठी लागणारी अन्नद्रव्ये, संप्रेरके, उपयुक्त जीवाणू वनस्पतीची रोग प्रतिकारक क्षमता वाढवितात.
गांडूळ खत निर्मिती कशी करावी?
गांडूळ खत निर्मितीसाठी जागा निवडत असताना सावली असेल अशी जागा निवडावी. एखाद्या झाडाखाली, छपरामध्ये किंवा खोलीमध्ये गांडूळ खताचा बेड (Varmi Compost Khat) असावा. जिथे बेड असेल तेथील जमीन टणक असावी. जेणेकरून गांडूळ जमिनीमध्ये जाणार नाहीत याची काळजी घ्यावी. अलीकडे प्लास्टिकचे रेडिमेड बेडही मिळत आहेत. त्याचा देखील तुम्ही वापर करू शकतात. 20 फूट लांब 3 फूट रुंद आणि 2 फूट उंच असा बेड तयार करावा. सुरवातीला त्यामध्ये पालापाचोळा, उसाचे पाचट गवत ६ इंचाचा थर करावा. त्यावर एक ते दीड फूट शेणखत टाकावे. आता यावर 2 किलो गांडूळ सोडावे आणि त्यावर बारदाणाने (पोत्याने) झाकून 10 ते 20 लिटर पाणी रोज मारावे.
पोती झाकताना वापसा राहील याची काळजी घ्यावी. सात ते आठ दिवसात गांडूळाची विष्टा दिसायला लागेल. याचाच अर्थ आपला गांडूळ खत तयार होत आहे. अशा पद्धतीने 30 ते 35 दिवस पाणी मारत राहावे. त्यानंतर तुम्हाला निदर्शनास येईल, कि गांडूळ खत तयार झाले आहे. मग काही दिवस पाणी मारणे बंद करावे. गांडूळ खत कोरडे झाल्यानंतर त्या गांडूळ खताला छोट्या भागात विभागून चाळून घ्यावे. हे खत गोणीमध्ये भरून ठेवावे लागेल तसे वापरावे.